सुगरणच्या रेसिपी महिलांसाठी पर्वणी
प्रभादेवीत स्पर्धेच्या भेटवस्तूंचे वाटप
प्रभादेवी, ता. ११ (बातमीदार) : गेले तीन महिने ‘सकाळ’मधून सुगरण सदराखाली विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपी प्रसिद्ध केल्या, त्याचा आम्हा गृहिणींना चांगला फायदा झाला, या रेसिपी आमच्यासाठी पर्वणीच ठरल्या, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या. सकाळ माध्यम समूहाने महिलांसाठी आयोजित केलेल्या सुगरण स्पर्धेतील सहभागी महिलांना भेटवस्तूंचे वाटप सोमवारी प्रभादेवी येथील प्रभा विनायक सोसायटीच्या कार्यालयात करण्यात आले. त्या वेळेस महिलांनी या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.
विविध पदार्थांच्या कृती म्हणजे महिलांसाठी खजिना होता. याचा संग्रह आम्ही जतन करून ठेवला असून या निमित्ताने दररोज नवीन पदार्थ शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी आम्हाला मिळाली असे एका महिलेने सांगितले. सुगरण स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना भेटवस्तूंचे वाटप शीला खाटपे, आत्माराम बंडबे व किसन सारंग यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळ माध्यम समूहाने महिलांसाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सुगरण स्पर्धेच्या निमित्ताने महिलांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले असल्याचे शीला खाटपे यांनी सांगितले.
...