ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन
मुंबई, ता. ११ ः रंगभूमी, चित्रपट, मालिका तसेच जाहिरात क्षेत्रात आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत (वय ८९) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. माहीम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रेखा कामत यांचं माहेरचं नाव कुमुद सुखटणकर. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांनी बहीण चित्रासोबत नृत्य आणि गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. प्रसिद्ध नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले. रंगभूमीवर काम करताना त्यांनी विजया मेहता दिग्दर्शित ‘यातनाघर’ तसेच अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ या प्रायोगिक नाटकातही काम केले. पटकथा लेखक ग. रा. कामत यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. १९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा यांचा पहिला चित्रपट, प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ प्रेक्षकांना खूप भावली.
रेखा कामत यांनी ‘आजी’ची भूमिका अनेक जाहिरातींमधे साकारली. चित्रा नवाथे आणि रेखा या दोघी सख्ख्या बहिणी. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाने चांगलीच गाजविली. ‘गृहदेवता’, ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’, ‘अगंबाई अरेच्चा’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘नेताजी पालकर’ चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य, तर ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ,‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. तब्बल सहा दशके त्या कलाविश्वात काम करीत होत्या.