डीव्ही मोटारींच्या गैरप्रकाराकडे
राजशिष्टाचार विभागाचे दुर्लक्ष
तक्रारच न आल्याने अद्याप कारवाई नाही
प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत तडजोड झाल्याचा मुद्दा गाजत असताना राज्यात मात्र अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी पुरवल्या जाणाऱ्या डीव्ही वाहनांच्या सुरक्षेबाबत प्रशासन बेफिकीर असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात तक्रार करून दोन महिन्यानंतरही अद्याप तक्रारच प्राप्त न झाल्याचा दावा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर यांनी केला. त्यामुळे डीव्ही मोटारींच्या गैरप्रकाराला पायबंद घालण्यासाठी प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे.
राज्य अतिथींसाठी पुरवण्यात येणाऱ्या वाहनांच्या गैरप्रकाराबाबत ‘सकाळ’ने नुकतीच वाचा फोडली. परिवहन सेवेच्या नियंत्रकपदी असताना किशोर गायकर यांनी आपल्या पदाच्या गैरवापर केला. डीव्ही वाहनांच्या सुरक्षेसोबत तडजोड केल्यासंदर्भात २३ नोव्हेंबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजशिष्टाचारमंत्री तसेच मुख्य राजशिष्टाचार अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती; मात्र अद्याप या तक्रारीबद्दल माहिती नसल्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दुसरीकडे तक्रार दाखल केल्याची पोचपावती तक्रारकर्त्या जीटीएस वाहन चालक संघटनेने घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे नेमके काय झाले, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
---------
आगामी २६ जानेवारीनिमित्त राजशिष्टाचार विभागाकडे अनेक कामे आहेत. त्यामुळे गायकर प्रकरणात चौकशीला थोडा वेळ लागेल.
- अशोक सावळे, उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग
---------
राजशिष्टाचार विभागाकडे याप्रकरणी तक्रार आल्यास त्याची त्वरित चौकशी केल्या जाईल.
- मनीषा म्हैसकर, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी
---------