भिवंडी महापालिकेची हॉटेल्स सीलबंद करीत कारवाई
कोरोना साथरोग अधिनियमाचे उल्लंघनप्रकरणी कठोर पावले
भिवंडी, ता. ११ (बातमीदार) ः ओमिक्रॉन व कोविड संसर्गजन्य आजाराचे संकट भिवंडीत मोठ्या प्रमाणात घोंघावत आहे. त्यामुळे भिवंडी महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. लस घेणे बंधनकारक आहे अशा सूचना पालिका प्रशासनाने नागरिकांना व आस्थापने दुकान, हॉटेल, यंत्रमाग कारखाने विभागामध्ये काम करणाऱ्या कामगार,मालक आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.तरी सुद्धा काही जणांकडून याचे उल्लंघन होत आहे. अशा उल्लंगन करणाऱ्या हाँटेल चालकासह कामगारांच्या विरोधात महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रातील ६ हाँटेल, तसेच बियरबार व दुकानदारावर दंडात्मक व सीलबंद करण्याची कारवाई आज महापालिका प्रशासनाचावतीने करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने साथरोग अधिनियम १९७ तसेच आपत्ती व्यवस्थान अधिनियम २००५ अंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू केलेले आहेत. या नियमांतर्गत सर्व खाजगी आस्थापनांमध्ये यात हॉटेल,दुकानांमध्ये ५० टक्के गिऱ्हाईकांची उपस्थिती असणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. पण, काही जणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार पालिका आयुक्तांकडे केली गेली. काही हॉटेल्सची प्रभाग अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष तपासणी केली. त्यावेळी काही ठिकाणी हॉटेलमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गिऱ्हाईक आढळून आल्याने या हॉटेल्सवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
----------------------------
सहायक आयुक्त सुनील भोईर यांनी बारादरी हॉटेल व किर्ती बियर बार सिल केले. तसेच,सुपर मार्केट आणि फ्रुट प्राइड चाविंद्रा या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण नसल्याने सहाय्यक आयुक्त दिलीप खाने यांनी दोन्ही हॉटेल्स सील केली. तसेच कल्याण रोड येथील लिबर्टी हॉटेल येथे सुध्दा लसीकरण पूर्ण न झालेले कर्मचारी काम करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड प्रभाग अधिकारी बाळाराम जाधव यांनी वसुल केला आहे.
इंडिया हॉटेल, हिंदुस्तान हॉटेल, असरार मिठाईवाला, या दुकानांची देखील तपासणी केली. या ठिकाणी देखील काम करीत असलेल्या काही कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे हॉटेल चालकांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. दरगाह रोड काकूबाई चाळ येथील गोल्डन हॉटेलमध्ये ५०% पेक्षा गिऱ्हाईक यांची उपस्थिती असल्याने हॉटेलवर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.