वसई-विरार पालिकेत होणार डॉक्टरांची भरती
विरार, ता. ११ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका हद्दीत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक डॉक्टरांची गरज लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने डॉक्टर भरतीस सुरुवात केली आहे. पालिकेने बंद केलेले करोना उपचार केंद्र पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टरांची गरज लागणार असून यासाठी अधिक ३० डॉक्टरांच्या ठेका पद्धतीवरील नियुक्तीस परवानगी दिली गेली आहे. यामध्ये १५ आयुर्वेदिक आणि १५ होमियोपथी डॉक्टरांचा समावेश आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मागील पाच दिवसांत चार हजाराच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेने तात्पुरती बंद केलेली करोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू केली आहेत. यामध्ये बोळिंज आणि नालासोपारा येथील रुग्णालयांचा समावेश असून वरुण इंडस्ट्री येथील उपचार केंद्राचादेखील समावेश आहे. तसेच पालिका आता म्हाडाच्या इमारतीत उपचार केंद्र तयार करत आहे. या ठिकाणी २०० फ्लॅटचा समावेश आहे. या डॉक्टरांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ठेका पद्धतीवर घेण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे उपचार केंद्रात या डॉक्टरांचा अधिकाधिक फायदा रुग्णांना होण्यास मदत होणार आहे.