बोगस रेशनकार्डप्रकरणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याला अटक
पालघर तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागातील धक्कादायक प्रकार
मनोर, ता. ११ ः पालघर तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागातून बोगस रेशनकार्ड तयार करून दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुरवठा निरीक्षकांच्या फिर्यादीवरून पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रेशनकार्ड तयार करून देणारा एजंट,पालघर शहरातील महा ई सेवा केंद्राचा मालक आणि पुरवठा कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याचा सहभाग आढळून आला आहे. कंत्राटी कर्मचारी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याची माहिती समोर येत आहे. पालघर पुरवठा कार्यालयातून हजारो बोगस रेशनकार्ड तयार करून दिल्याचा आरोप केला जात असून चौकशीची मागणी केली जात आहे.
पालघर तालुक्याच्या सफाळे भागातील एका महिलेने रेशन कार्ड तयार करण्याचे काम नीतेश पारधी नावाच्या एजंटला दिले होते. नीलेश पारधी याने पालघर शहरातील महा ई सेवा केंद्राचा मालक जयेश पाटील यांच्या माध्यमातून पुरवठा विभागाच्या कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी शुभम पाटील यांच्या मदतीने बोगस रेशन कार्ड तयार करून महिलेला दिले होते, परंतु रेशनकार्डवर धान्य मिळत नसल्याने शुक्रवारी (ता. ८) प्राधान्य कुटुंबाचा शिक्का मारून घेण्यासाठी बोगस रेशनकार्ड घेऊन ती महिला पालघर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कार्यालयात आली होती. पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेशनकार्ड पाहिल्यानंतर ते बोगस असल्याचे आढळून आले. पुरवठा निरीक्षक देवेंद्र पाटील यांनी महिलेचा जबाब नोंदवून पालघर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी पालघर पोलिसांकडून रेशनकार्ड तयार करणारा एजंट नीलेश पारधी, महा ई सेवा केंद्राचा मालक जयेश पाटील आणि पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचारी शुभम पाटील याला अटक करण्यात केली आहे. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
---
प्रतिक्रिया
तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात कोणत्याही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कोरी रेशनकार्ड दिली जात नाहीत. कागदपात्रांची तपासणी केल्यानंतर रेशनकार्ड दिली जातात. बोगस रेशनकार्ड मिळाल्यानंतर तात्काळ पालघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- सुनील शिंदे, तहसीलदार, पालघर