हाफकीनकडे ९० कोटींची थकबाकी

हाफकीनकडे ९० कोटींची थकबाकी

हाफकीनकडे ९० कोटींची थकबाकी विक्रेत्यांचा औषध पुरवठा थांबवण्याचा इशारा सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ११ : औषधे पुरवल्यानंतरही हाफकीन संस्थेकडे ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे त्रासलेल्या औषध पुरावठादारांनी हाफकीन संस्थेला पत्र लिहून थेट आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. शिवाय थकबाकी मिळाली नाही तर औषध पुरवठा थांबवण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे रुग्णालयांत औषध तुटवडा होण्याची भीती व्यक्त होत आहे. औषध पुरावठादारांनी २०१९-२० या वर्षात पुरवलेल्या औषधांची देयक थकीत आहेत. साधारणत: १०५ कोटी रुपयांच्या थकीत देयकांपैकी हाफकीन संस्थेने १० कोटी रुपये दिले आहेत. हाफकिनचे संचालक संदिप राठोड आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डिएमईआर) प्रधान सचिवांना २०१९-२० पासून ९० कोटी रुपये थकीत रक्कम देण्याबाबत किमान १० ते १२ वेळा पत्रव्यवहार केला. तरीही थकीत रक्कम मिळत नसल्याचे औषध पुरवठादारांनी म्हटले आहे. त्यामुळे आता आत्महत्या करण्याचीच परवानगी द्यावी, असे जळजळीत पत्र औषध पुरावठादारांनी हाफकीन व डीएमईआर प्रशासनाला लिहिले आहे. बिलाचे पैसे थकीत राहिल्याने औषध पुरावठादारांनी शासकीय रुग्णालयांस औषधांचा पुरवठा करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे सर जे. जे. रुग्णालयात औषध तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका असल्याचे आमदार अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्राद्वारे कळवले आहे. तसेच, जे जे रुग्णालयात २०२०-२१ मध्ये नोंदणी केलेले केवळ ३० टक्के औषधे उपलब्ध झाली असून त्यात कोरोना उपचारासाठी लागणारी अनेक औषधेदेखील उपलब्ध नसल्याचे नर्वेकर यांनी सांगितले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगत याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. ग्लोव्हजदेखील बाहेरून आणण्याची वेळ औषध पुरावठादारांनी औषधांचा पुरवठा कमी केल्याने जे जे रुग्णालयामध्ये एन्ट्रानील, सायट्रेट इंजेक्शन, अ‍ॅमोक्सीन क्लॅव्ह इंजेक्शन, अ‍ॅन्टी स्नेक व्हेनेम, हेपॅटायटीस, बी, इम्युनीग्लोबिन, पॅरोसेटामॉल, स्टराईल वॉटर तसेच कोरोना रुग्णासाठी लागणारी औषधे उपलब्ध नाहीत. तसेच, ग्लोव्हज देखील बाहेरुन आणण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. कोट सध्या पन्नास टक्के पुरवठादार औषध पुरवठा करत आहेत. थकीत देयके लवकर दिली गेली नाहीत; तर औषधांचा पुरवठा पूर्णतः बंद करण्यात येईल. - अभय पांडे, ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com