पुष्पक नगर नोडमध्ये कचऱ्याचे ढीग
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांचे आरोग्य धोक्यात
नवीन पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : नव्याने विकसित होत असलेल्या पुष्पकनगर वसाहतीमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. या कचऱ्याची सिडको प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट लावली जात नसल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित चिंचपाडा, कोपर, वाघिवली वाडा, वाघीवली, ओवळे, कोल्ही, पारगाव, दापोली आदी गावांचे पुनर्वसन वडघर येथील सिडकोच्या पुष्पकनगर नोड येथे करण्यात आले आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी बिल्डरच्या साह्याने इमारती उभारल्या आहेत. पनवेल शहरातील फ्लॅट्सच्या दरांच्या तुलनेत पुष्पकनगर येथील फ्लॅट्सचे दर कमी आहेत. त्यामुळे साहजिकच नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, पेण, अलिबाग, घाटमाथा आदी परिसरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक सदनिका खरेदी करून राहावयास आले आहेत. परंतु इथल्या मूलभूत सोयी सुविधांकडे सिडको व स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
सद्यस्थितीत पुष्पकनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर, इमारतींच्या आवारात, मैदानात, मोकळ्या भूखंडावर; तसेच जिथे पहावे तिथे जागोजागी कचरा पसरलेला आहे. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि डासांची पैदासही वाढली आहे. याकडे सिडको प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
--------------------
सिडकोने विकसित केलेल्या पुष्पकनगर वसाहतीतील इमारतींना वडघर ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या वेळेस नागरिक ग्रामपंचायतीला घरपट्टी भरतील, त्या वेळेस ग्रामपंचायत सोयीसुविधा पुरवेल. काही इमारती पाच वर्षांपूर्वीच्या आहेत, तरीही त्यांना घरपट्टीची आकारणी झालेली नाही. सिडकोने जरी वसाहत विकसित केली असली, तरीही सिडको ही स्थानिक स्वराज्य संस्था नसून, कर घेण्याचा अधिकार सिडकोला नाही. कर आकारण्याचा अधिकार स्थानिक ग्रामपंचायतीलाच आहे. घरपट्टी आकारणी पूर्ण झाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, गटार, पथदिवे, सांडपाणी व्यवस्थापन याबाबत योग्य कार्यवाही ग्रामपंचायतीकडून केली जाईल.
- नंदकिशोर भगत, ग्रामविकास अधिकारी, वडघर ग्रामपंचायत
----------------------------------------------------
पुष्पकनगर परिसरात जागोजागी साचलेला कचरा, रस्त्यावर आलेले सांडपाणी यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी ही विनंती.
- मनखुश नाईक, स्थानिक नागरिक