दंडानंतरही विनामास्क फिरणारे सुधारेना
सहा दिवसांत तीन लाख तीन हजार ६१४ रुपयांचा दंड वसूल
वाशी, ता. १२ (बातमीदार) ः नवी मुंबईतील विविध भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मास्क न लावणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जात आहे. तरीही अनेक बेजबाबदार नागरिक विनामास्क बिनधास्त फिरताना दिसतात. तर अनेकांचे मास्क हनुवटीला असतात. ६१४ नागरिकांकडून गेल्या दहा दिवसात तीन लाख तीन हजार ६१४ रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रशासनाकडून मास्क वापरण्याबाबत, सोशल डिस्टन्सिंगबाबत वारंवार जनजागृती करण्यात येत आहे, मात्र तरीही नागरिक सुधारत नसल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई पालिकेच्या विभाग कार्यालयांतर्गत असणाऱ्या बाजारपेठांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी काही बेजबाबदार नागरिक विनामास्क फिरताना दिसतात. शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानात कर्मचाऱ्यांसह ग्राहकही विनामास्क दिसतात. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पालिकेकडून कारवाईसाठी विशेष पथके देखील तैनात करण्यात आली असून त्यांच्याकडून कारवाई करण्यात येत असली तरी नागरिकांनीही जबाबदारीने अपेक्षित आहे.
१ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या ६१४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोविड १९ चा प्रार्दुभाव सुरू झाल्यापासून पावणे दोन वर्षात ३५ हजार ६१२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंडापोटी एक कोटी ७८ लाख ४८ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांकडून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तरी अनेकांकडून दुर्लक्ष होत असल्याने अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महापालिकेकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी देखील स्वतःहून काही जबाबदारी ओळखून मास्क वापरणे आवश्यक आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांविरोधात आणखी कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका