विधी सेवा प्राधिकरणाच्या टेबल कॅलेंडरचे अनावरण
धारावी, ता. ११ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्या हस्ते आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, न्यायमूर्ती पी. बी. वराळे, न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांच्या उपस्थितीत टेबल कॅलेंडर आणि डायरीचे अनावरण केले. या टेबल कॅलेंडरमध्ये राज्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समितीद्वारे प्रत्येक महिन्यात आयोजित केलेल्या विशेष दिवसांची आणि इतर समान किमान कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे. कॅलेंडरमधील प्रत्येक महिना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या विशिष्ट योजनेसाठी समर्पित आहे. ज्याचा उद्देश समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना आणि विविध गुन्हेगारी किंवा आपत्तींना बळी पडलेल्यांना कायदेशीर विधी सेवा व मदत प्रदान करणे हा आहे.
या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे नियोजित समान किमान कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती आणि काही सरकारी कार्यालयांमध्ये हे टेबल कॅलेंडर वितरित केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव हितेंद्र वाणी यांनी दिली.
...