पूर्ण लसवंतांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विविध कामांसाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. मात्र, जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच सरकारकडून शासकीय कार्यालयांमध्ये देखील कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रक काढत अत्यंत निकडीचे काम असल्यास व लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरूपामुळे तिसरी लाट आल्याचे स्पष्ट केल्याने उपाययोजनांबाबतची नियमावली जारी केली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनानेही सरकारकडील प्राप्त सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अभ्यांगतांना शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. यामध्ये मास्क लावणे, इतरांशी बोलताना नियमाप्रमाणे सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांनाच कार्यालयात प्रवेश देणे, तसेच तातडीच्या कामाशिवाय कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी काढले आहे.