‘जे.जे.’त होणार केवळ
अत्यावश्यक शस्त्रक्रिया
कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कोविडच्या तिसऱ्या लाटेत डॉक्टरांसह अनेक आरोग्य कर्मचारी बाधित होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक आणि आपात्कालीन शस्त्रक्रियाच करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईत कोविडमुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण पुन्हा वाढू लागला आहे. सध्या मुंबईत सर्वसामान्य नागरिकांसह आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स, प्राध्यापक, निवासी डॉक्टर्स, परिचारिकाही कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स आणि कर्मचारी विलगीकरणात असल्याने आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे जे.जे. रुग्णालयात केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केल्या जात आहेत. अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली आहे.
---
अलिबागमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातही जे.जे. रुग्णालयाचे ५० हून अधिक डॉक्टर्स पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची अडचण आणखी वाढली आहे.
- डॉ. एकनाथ पवार, प्रभारी अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय.