दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
वाडा, ता. १२ (बातमीदार) ः तालुक्यातील गारगाव- परळी- देवळी या विभागात १३३ गावपाड्यांतील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आदिवासी विकास संघर्ष समितीने सोमवारपासून (ता. १०) बेमुदत उपोषण सुरू केले आहे; मात्र तीन दिवसांतही बांधकाम प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने उपोषण सुरूच आहे. दरम्यान, दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आदिवासी संघर्ष समितीच्या कृष्णा जंगली (उंबरपाडा) व सदू धापटे (गारगाव) या दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला; मात्र उपोषणकर्त्यांनी डॉक्टरांची मागणी फेटाळून लावत उपोषणस्थळीच उपचार करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील गारगाव-देवळी व परळी विभागातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. विकासकामे न करताच पैशांचा अपहार केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये गावांची व पाड्यांची नावे बदलून तीच कामे झाल्याचे दाखवण्यात आले आहे. ही नावे दाखवून अनेकदा बोगस बिले काढण्यात आली आहेत. याचे पुरावे शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी दिले असतानाही शासन प्रशासन स्तरावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तहसीलदार उद्धव कदम, पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली; मात्र ठोस आश्वासन मिळत नाही तोवर उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
या उपोषणाला श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे प्रमुख विवेक पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद सदस्य मिताली बागुल, पंचायत समितीचे उपसभापती अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य सागर ठाकरे आदींनी पाठिंबा दर्शवला; तर शिवसेना, मनसे, काँग्रेस, शेकाप, संभाजी बिग्रेड, आदिवासी एकता परिषद, आदिवासी मुक्ती मोर्चा आदी पक्ष व सामाजिक संघटनांनीही आपला पाठिंबा दर्शवला आहे.