पालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करा
साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचा पुनर्वसन कृती समितीचा आरोप
कल्याण, ता. १२ (बातमीदार) ः कल्याणसहीत राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने राज्य शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्रीचे संचारबंदीचे आदेश दिले आहेत, पण केडीएमसी प्रशासन कल्याण पूर्वमधील रस्तारुंदीकरण प्रकरणात हजारो नागरिकांना नोटिसा बजावून पालिका मुख्यालयामध्ये गर्दी जमवत आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत पालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पुनर्वसन कृती समिती न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष उदय रसाळ यांनी ‘सकाळ’ला दिली.
कल्याण पूर्वमधील काटेमानिवली नाका ते गणपती चौक मार्गे तिसगाव नाका अशा यू टाइप रस्त्याचे रुंदीकरण केडीएमसीकडून करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने मागील वर्षी ९ फेब्रुवारी २०२१ मध्ये नागरिकांच्या हरकती घेतल्या होत्या. १२, १४ आणि १७ जानेवारी रोजी हरकती घेतलेल्या ७०० हून अधिक दुकानदार आणि रहिवासी यांना नोटिसा बजावून सुनावणी घेण्यात येणार होती. नोटिसा आल्याने पालिका मुख्यालयासमोर नागरिक जमू लागले. शासनाने जमावबंदी आदेश दिले असताना नागरिकांना बोलावले कसे, असा सवाल सर्वसामान्य विचारू लागले आहेत.
----
पोलिस आणि सुरक्षा विभागाने मध्यस्थी करत पुनर्वसन कृती समिती अध्यक्ष उदय रसाळ आणि पदाधिकारी विजय मोरे, दुर्गेश फडोळ यांच्या शिष्टमंडळाची भेट पालिका अधिकाऱ्यांशी घालून दिली. अधिकारी वर्गाने मुदतवाढीस नकार देत २१ जानेवारीपर्यंत नागरिकांनी हरकती दिल्यास शासनाला अहवाल जाईल; अन्यथा हा विषय बारगळला जाईल. यामुळे हरकती नोंदवा असे आवाहन केले.