लस `नकारदार` गंभीर
रुग्णालयात दाखल ५७ जणांपैकी २४ रुग्ण आयसीयूत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारद्वारे नागरिकांना लसीकरण करण्याबाबत वावंरावर आवाहन केले जाते. असे असतानाही अनेक नगरिक त्याबाबत गंभीर नसल्याने हे दुर्लक्ष त्यांच्या आरोग्यावर बेतण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बाधितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जरी कमी असले, तरी ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांवर मात्र थेट अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयूमध्ये जाण्याची वेळ आली आहे. सध्याच्या घडीला आयसीयूमध्ये दाखल रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण असे आहेत, ज्यांनी लशीचा एकही डोस घेतलेला नाही. तसेच ते इतर आजारांनीही ग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिक आहेत.
ठाण्यात आजच्या घडीला ५७ रुग्ण हे आयसीयूमध्ये दाखल आहेत. यापैकी २४ रुग्ण असे आहेत, ज्यांनी लशीचा एकही डोस घेतलेला नाही. एकही डोस न घेतल्यामुळे अशा नागरिकांना अधिक लक्षणे जाणवत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ आल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. याशिवाय आयसीयूमध्ये दाखल ४ रुग्णांनी केवळ एकच डोस घेतला असून उर्वरित २७ रुग्णांनी मात्र लशीचे दोन्ही डोस घेतल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना लक्षणे अधिक जाणवत असून अशा नागरिकांनाच आयसीयूमध्ये दाखल करावे लागत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणाच कामाला लागली होती. आयसीयू, ऑक्सिजन तसेच सामान्य खाटादेखील कमी पडू लागल्या होत्या. त्यावेळी लस घेणाऱ्यांचे प्रमाण देखील अत्यल्प होते. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जरी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. ही जरी समाधानाची बाब असली तरी, लस न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे आयसीयूमध्ये नागरिकांना भरती करण्याची वेळ येत असल्याचे उघड झाले आहे. पालिका प्रशासनाकडून सुरुवातीपासूनच लस घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवल्या. मात्र, व्यापक प्रमाणात जनजागृती करूनही अजूनही लस घेण्याबाबत नागरिकांच्या मानसिकतेमध्ये बदल होताना दिसत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.
दोन्ही डोस घेतलेल्यांची प्रकृती स्थिर
आयसीयूमध्ये दाखल असलेले मात्र दोन्ही डोस घेतलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. इतर आजार असलेले आणि ज्यांचे वय ६५ च्या पुढे आहे, अशा नागरिकांची देखील विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
१८ आणि २६ वयोगटातील तरुणही आयसीयूत
लशीचा एकही डोस न घेणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय तरुण वर्गाला देखील आला आहे. पार्किंग प्लाझा या ठिकाणी आयसीयूमध्ये एक १८ वर्षीय तर एका २६ वर्षीय तरुणाला दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, लस न घेतल्यामुळे तरुणांना देखील आयसीयूत दाखल व्हावे लागत असल्याने किमान आता तरी नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
ठाणे पालिका क्षेत्रात...
८५ टक्के लसीकरण पूर्ण
१५ टक्के लसीकरण शिल्लक
२५ लाख ३६ हजार ३५९ लसवंत
१४ लाख ४० हजार ७७३ पहिला डोस
१० लाख ९५ हजार ५८६ दुसरा डोस