कोरोनापासून झोपडपट्टी, चाळी सुरक्षित?

कोरोनापासून झोपडपट्टी, चाळी सुरक्षित?

कोरोनापासून झोपडपट्टी, चाळी सुरक्षित? ‘फीवर ओपीडी’चा परिणाम; प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या शून्यावर सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने शिरकाव केल्याने मुंबईत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्यादेखील लाखाच्या पार गेली आहे. असे असले तरी झोपडपट्टी, चाळींमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. एकीकडे वाढत्या रुग्णांमुळे इमारती आणि मजले सीलबंद होत असताना दुसरीकडे झोपडपट्टी आणि चाळींमधील प्रतिबंधित क्षेत्रांची (कन्टेन्मेंट झोन) संख्या शून्यावर आली आहे. पालिकेने सुरू केलेल्या ‘फीवर ओपीडी’मुळे रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचेही बोलले जात आहे. १ जानेवारीला मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या १०; तर सीलबंद इमारतींची संख्या १५७ वर पोहोचली. पुढील पाच दिवसांत त्यात दुपटीने वाढ होत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २०; तर सीलबंद इमारतींची संख्या ४६२ वर पोहोचली. बधितांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा दैनंदिन आकडाही ३१ हजार १८२ पोहोचला; तर ५४० पेक्षा अधिक अतिजोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे लागले. गेल्या आठवड्यात मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. दररोज बाधित रुग्णांचा आकडा २० हजारांच्या वर पोहोचला. त्यात पॉझिटिव्हिटीचा दरही २५ टक्क्यांच्या वर गेला. त्यामुळे चिंता वाढली होती. परिणामी, १० जानेवारीला मुंबईत झोपडपट्टी आणि चाळींमधील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढून ३० झाली; तर सीलबंद इमारतींचा आकडा १६८ वर पोहोचला. यानंतर पालिका प्रशासनाने गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून ती ६० ते ६५ हजारांवर नेली. संशयित परिसरातील घराघरात चाचण्या सुरू केल्या. याचदरम्यान तापाची साथ पसरल्याने पालिकेने झोपडपट्टी आणि चाळी असलेल्या भागात २५० हून अधिक ‘फीवर ओपीडी’ सुरू केल्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत मुंबईतील कोविड परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली. परिणामी झोपडपट्टी आणि चाळींतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घसरून ती थेट शून्यावर आली आहे; तर सीलबंद इमारतींच्या संख्येतदेखील ७० टक्क्यांनी घट होऊन ती ६३ पर्यंत खाली आली. बाधित रुग्णांची दैनंदिन प्रकरणे २० हजार ७०० वरून ११ हजार ६४७ पर्यंत खाली आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत मुंबईचा पॉझिटिव्हिटीचा दर ३० टक्क्यांवरून २० वर आला आहे. रुग्णालयांत दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचा आलेखही कमी झाला असून, मुंबईतील तिसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यात यश येत आहे. प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा तारीख झोपडपट्टी/चाळी इमारती १ जानेवारी १० १५७ ६ जानेवारी २० ४६२ १० जानेवारी ३० १६८ १२ जानेवारी ० ६३ चिंतेत भर मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोनाने डिसेंबरअखेरीपासून पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडू लागले. २१ डिसेंबरपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने मुंबईतील पॉझिटिव्हिटीचा दर २५ टक्क्यांच्या वर गेला. त्यामुळे मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या पुन्हा वाढू लागली. के पूर्व, के पश्चिम, एच पश्चिम आणि डी या विभागांत सर्वाधिक बाधित रुग्ण सापडू लागले. त्यामुळे अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे, ग्रँट रोड आणि परळ या भागांत चिंता वाढली होती. प्रतिबंधित क्षेत्राचे नियम बदलले आहेत. शिवाय चाचण्यांची संख्या वाढवली असून फीवर ओपीडीदेखील सुरू केल्या आहेत. रुग्णसंख्या वाढलेली दिसत असली तरी प्रतिबंधित क्षेत्र आणि सीलबंद इमारतींची संख्या कमी झाली आहे. - मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका झोपडपट्टीमधील ८५ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. ज्या १५ टक्के रुग्णांना लक्षणे आहेत, त्यांची जम्बो कोविड केंद्रामध्ये व्यवस्था केली आहे. त्यामुळे बाधा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. चाचण्यांचे प्रमाणदेखील वाढवण्यात आले आहे. - किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी-उत्तर विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com