कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने
रेल्वे प्रवासी संख्या घटली
रग्णवाढ आणि वर्क फ्रॉम होमचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेल्या युनिर्व्हसल पासधारकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. दिवसेंदिवस लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने लोकलचे प्रवासीही वाढले होते. मात्र, आता कोरोना संसर्ग वाढू लागल्याने प्रवाशांची संख्या घटू लागली आहे.
कोरोनाबाबतच्या नव्या निर्बंधांनुसार अनेक कार्यालयांना वर्क फ्राॅम होम आणि दिवसाआड काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम रेल्वे प्रवाशांची संख्या कमी होण्यावर झाला आहे. डिसेंबरमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या ६० लाखांच्या वर गेली होती. मात्र, आता ती आता ४० लाखांच्या घरात आली आहे.
लसीकरण वाढल्याने प्रवाशांची संख्या वाढली होती. त्यामुळे २० डिसेंबर २०२१ रोजी मध्य रेल्वेवर ३७ लाख आणि पश्चिम रेल्वेवर २८ लाख अशी सर्वाधिक प्रवाशांची नोंद झाली. दोन्ही रेल्वेमार्गांवर एकूण ६५ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. इतर वेळी सुमारे ५० ते ६० लाख प्रवासी प्रवास करत होते. कोरोनापूर्व काळात ७० ते ७५ लाख प्रवाशांची नोंद झाली होती. त्यामुळे कोरोनापूर्व काळातील आकडा गाठण्यासाठी २० टक्के प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र, जानेवारीच्या सुरुवातीला मुंबई महानगरात हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यानंतर राज्य सरकारने सरकारी आणि खासगी कार्यालयांना पुन्हा दिवसाआड काम करणे किंवा वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या. अनेक कार्यालयांनी त्यांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी कार्यालयांत कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या ५० टक्के करण्यात आली आहे. परिणामी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
सध्या मध्य आणि पश्चिम मार्गांवर ४० लाख लोकल प्रवाशांची नोंद होत आहे. राज्य सरकारच्या कडक निर्बंधांमुळे पुन्हा प्रवाशांची संख्या कमी झाली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सध्याचे रोजचे प्रवासी
मध्य रेल्वे ः २२ लाख
पश्चिम रेल्वे ः १८ लाख
२० डिसेंबर २०२१ रोजीचे प्रवासी
मध्य रेल्वे ः ३७ लाख
पश्चिम रेल्वे ः २८ लाख