शाळा १७ जानेवारीपासून सुरू करणार
महाराष्ट्र स्कूल ट्रस्टीज् असोसिएशनचा निर्णय
मुंबई, ता. १२ ः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले; मात्र बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध नसल्याचा दावा करत महाराष्ट्र स्कूल ट्रस्टीज् असोसिएशनने (मेस्टा) १७ जानेवारीपासून आपल्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण सचिवांना प्रस्ताव पाठवणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे १७ जानेवारीपासूनच ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सर्व प्रकारची खबरदारी घेत सुरू करणार आहोत. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शिवाय मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे पुढे आल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याची माहिती मेस्टाचे अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी दिली. दरम्यान, शाळा बंद न करण्याबाबतची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा आढावा घेत १५ फेब्रुवारीनंतर शाळा सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
--
शिक्षण राज्यमंत्र्यांचा प्रस्ताव
दरम्यान, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शाळा १७ जानेवारीपासून सुरू करण्यासाठी संमती दर्शवली आहे. त्यासाठी आपण लवकरच शालेय शिक्षण सचिवांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.