राज्य वृत्तपत्र विक्रेता
संघटनेचे अधिवेशन स्थगित
मुंबई, ता. १२ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे ठाण्यात होणारे राज्य अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक नुकतीच कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, संघटना सचिव संजय पावशे, अण्णा जगताप, दत्ता घाडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन २६ व २७ जानेवारी रोजी ठाणे येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने सर्वच जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. शासनाच्या आदेशानुसार केवळ ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन घेणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले असून कोव्हिडची स्थिती निवळल्यानंतर चर्चा करून अधिवेशनाची तारीख नव्याने जाहीर केली जाईल, अशी माहिती सुनील पाटणकर यांनी दिली. बैठकीत ठाणे येथील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. गरज पडल्यास ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आंदोलन उभारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.