राज्यात कोरोना रुग्णांसह मृत्यू वाढले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. १२ : राज्यात कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या बुधवारी पुन्हा वाढली. आज राज्यात ४६ हजार ७२३ नव्या रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी ३४ हजार ४२४, तर सोमवारी ३३ हजार ४७० रुग्ण आढळले होते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल, नाशिक, पुणे क्षेत्रात रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने राज्यातील रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख ४० हजार १२२ इतकी झाली आहे. रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कालच्या २२ वरून ३२ पर्यंत वाढ झाली. त्यामुळे राज्यातील मृतांचा एकूण आकडा एक लाख ४१ हजार ७०१ इतका झाला आहे.
दरम्यान, बुधवारी राज्यात २८ हजार ०४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९४.५२ टक्के झाले आहे.
--------
राज्यात ओमक्रॉनचे ८६ नवे बाधित
आज राज्यात ओमिक्रॉनच्या ८६ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात मुंबईतील २१ रुग्णांचा समावेश आहे. नव्या ८६ रुग्णांपैकी पुणे ५३, मुंबई २१, पिंपरी चिंचवड सहा, सातारा तीन, नाशिक दोन, पुणे ग्रामीणमधील एका रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या एक हजार ३६७ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ७३४ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.