स्वतःचे समजून काम करा; फळ निश्चित मिळेल ः हणमंत गायकवाड

स्वतःचे समजून काम करा; फळ निश्चित मिळेल ः हणमंत गायकवाड

स्वतःचे समजून काम करा; फळ निश्चित मिळेल ः हणमंत गायकवाड ठाणे (बातमीदार) : जेथे तुम्ही काम कराल ते दुसऱ्याचे म्हणून नाही तर स्वतःचे म्हणून करा, त्याचे फळ नक्कीच मिळेल. प्रत्येक काम सर्वोत्तम व्हायला हवे आणि त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी हवी, तरच दीर्घकालीन यश पदरात पडते, असा संदेश बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हणमंत गायकवाड यांनी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत तरुणांना दिला. ठाण्यातील प्रसिद्ध अश्या ३६ व्या कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवारी बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हणमंत गायकवाड यांनी गुंफले. या वेळी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष लॅब इंडियाचे संचालक श्रीकांत बापट; तर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते. हाऊसकीपिंग क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी १९९७ मध्ये आठ सहकाऱ्यांना सोबत घेऊन भारत विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम सुरू केले. त्या वेळी पहिले १२ हजार रुपयांचे मिळालेले बिल आणि त्यानंतरच्या २४ वर्षांत देशभरात आणि देशाबाहेर व्यवसाय पसरवून हजारो कोटींची उलाढाल असा संघर्ष आणि जिद्दीचा प्रवास गायकवाड यांनी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या व्याख्यानातून उलगडला. साताऱ्यात जन्म, हलाखीच्या परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या हणमंत गायकवाड यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून १९९१ मध्ये भारत विकास प्रतिष्ठान या संस्थेची नोंदणी केली. १९९४ मध्ये टाटा मोटर्समध्ये नोकरी मिळाली; मात्र वेगळे काही तरी करायचे या जिद्दीने त्यांनी काही सहकाऱ्यांना घेऊन हाऊसकीपिंगचा व्यवसाय सुरू केला. गायकवाड म्हणाले, जे काम कराल ते माझे काम म्हणून केले तर ते चांगले होते, पण काम सर्वोत्तम व्हायला हवे, त्यासाठी अपार कष्टाची गरज असते. ही कामे करत असताना मी गुणवत्ता देत गेलो तसतशी मला चांगली माणसे मिळत गेली, कामे मिळत गेली. आपल्या कामाचा विस्तार कसा होत गेला हे सांगताना ते म्हणतात, २००४ मध्ये संसदेचे हाऊसकीपिंगचे काम मिळाले आणि त्यानंतर पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालयाचेही काम मिळाले. देशातील ५७७ कंपन्या, गोल्डन टेम्पल, सोमनाथ, शिर्डी, सिद्धिविनायक अशी सर्व मोठी मंदिरे, देशातील १६ विमानतळे आणि मेट्रो सेवा येथे बीव्हीजी ग्रुप सेवा देत आहे. केवळ याच क्षेत्रात न राहता ग्रुपने पॅरामेडिकल सेवेतही देशभरात पाय रोवले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही ही सेवा देत असून या सेवेचा लाखो नागरिकांना लाभ मिळाला आहे. कोरोना काळात आम्ही ९७ टक्के उपस्थिती ठेवून ही सेवा दिली. नातेवाईक पुढे येत नसल्याने अनेकांचे अंत्यसंस्कारही आम्ही केले. देशातील मोठी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये ही सेवा देत असल्याचेही गायकवाड म्हणाले. कृषी क्षेत्रातही पसारा वाढत असून एक लाख शेतकरी कंपनीशी जोडले गेले आहेत. उत्पादकता वाढवणे यापासून भाकड गाईंसाठी आम्ही काम करत आहोत. आयुर्वेदातही आम्ही काम करत असून हृदयविकार, फुप्फुस विकार, कर्करोग अशा अनेक रोगांवर परिणामकारक औषधांचे उत्पादन केले जात आहे. कोरोना काळात आम्ही तयार केलेले शत प्लस हे औषध गुणकारी ठरले आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या या औषधाने इतर आरोग्य समस्याही दूर होत असल्याचे अनुभव आहेत. पुढील १० वर्षांत १० कोटी नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा मनोदय गायकवाड यांनी व्यक्त केला. जगात संधी खूप आहेत, पण त्या ओळखता आल्या पाहिजेत. जिद्द, महत्त्वाकांक्षा, मेहनत करण्याची तयारी आणि आत्मविश्वास असला तर आजूबाजूचा परिसर, निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. डोळ्यासमोर व्हीजन ठेवा आणि मनातून पेटून उठून कामात झोकून द्या, यश तुमचेच आहे, असा सल्लाही गायकवाड यांनी उपस्थित तरुणांना दिला. या वेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना गायकवाड यांनी समर्पक उत्तरे दिली. बीज अंकुरण्यासाठी सुपीक जमीन लागते. त्याला योग्य वातावरण द्यावे लागते. फक्त खडकावर ठेवून बीज अंकुरत नाही, असा दाखला देत त्यांनी माणसे कशी निवडली, त्यांना सुविधा कशा दिल्या, त्यातून गुणवत्तापूर्ण काम कसे मिळाले हे हणमंत गायकवाड यांनी प्रश्नकर्त्यांना पटवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com