कल्याणमधील १८ गावांना जीवन प्राधिकरणाद्वारे पाणी
२४ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर
टिटवाळा, ता. १३ (बातमीदार) ः कल्याण तालुक्यातील १८ गावांसाठी रायते येथे उल्हास नदीवर स्वतंत्र पाणी योजना मंजूर केली आहे. जीवन प्राधिकरण अंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली २४ कोटी ५० लाखांहून अधिक रक्कम त्यासाठी मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.
कल्याण तालुक्यातील रायते, गोवेली, घोटसई, रेवती, बापसाई, नवगाव, कोळीब, मामनोली, आणखर, आणखरपाडा, वाहोळी, आपटी, केळणी, आपटी बार्हे या गावासाठी रायते येथे प्रादेशिक नळ पाणी योजना सुरू होती. या योजनेला ५० वर्षे उलटल्यामुळे योजना चालवणे खर्चिक बनले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरण अंतर्गत या योजनेची पुनर्बांधणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यासाठी स्वतंत्र बैठका घेऊन अखेर नुकताच राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागण्याप्रसंगी या योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली, असे आमदार कथोरे यांनी सांगितले.
लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार
रायते येथे या योजनेची उभारणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. लवकरच या योजनेची निविदा निघणार असून या योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी खडवली येथे जीवन प्राधिकरणअंतर्गत पाणी योजना उभारणीचे काम सुरू आहे. रायते येथील योजना काही ग्रामपंचायतींनी ठराव देण्यास विलंब केल्याने रखडली होती ती आता मार्गी लागली.