ओमिक्रॉनमधून बरे झालेल्यांमध्ये अशक्तपणा, अस्वस्थता

ओमिक्रॉनमधून बरे झालेल्यांमध्ये अशक्तपणा, अस्वस्थता

ओमिक्रॉनमधून बरे झालेल्यांमध्ये अशक्तपणा, अस्वस्थता रुग्णांकडून आरोग्याबाबत तक्रारी; डॉक्टरांचे निष्कर्षाकडे सावध पाऊल सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १३ : डिसेंबरच्या मध्यापासून सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेमागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट `ओमिक्रॉन` असल्याचे सांगितले जात आहे. देशासह राज्यातही या ओमिक्रॉनबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत प्रचंड प्रमाणात वाढली. त्यातून काही जण बरे होऊन सुखरूप घरीही परतले; परंतु डेल्टा व्हेरिएंटप्रममाणे ओमिक्रॉनमधून बरे झालेले रुग्णही आरोग्याबाबत तक्रारी करू लागले आहेत. बऱ्याच रुग्णांना अस्वस्थता, अशक्तपणा, डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होत आहे. दरम्यान, मुंबईतील वैद्यकीय तज्ज्ञांना याबाबत विचारणा केली असता, या समस्या कायम राहतात का, हे दोन आठवड्यांनंतर पहावे लागेल. तोपर्यंत निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे ते म्हणाले. कोविडच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटने खूप धुमाकूळ घातला. या आजारातून बरे होऊनही अनेक रुग्ण कोविडनंतरच्या आरोग्याच्या समस्या जसे की निद्रानाश, न्युरोशी संबंधित समस्या, अस्वस्थता आदी तक्रारी करत होते. ज्याचा नागरिकांना बराच काळ त्रास सहन करावा लागला. ओमिक्रॉनचा त्रास झालेल्यांनाही कोविडनंतरच्या समस्या जाणवत आहेत. ओमिक्रॉनबाधित बहुतांश रुग्ण तीन ते चार दिवसांत बरे होत असले तरी त्यानंतर काहींना अशक्तपणा, अस्वस्थता, डोके व अंगदुखीच्या तक्रारी आहेत. याला पोस्ट-कोविड समस्या म्हणणे खूप घाईचे ठरेल. ओमिक्रानबाधित नागरिक आताच बरे झाले आहेत. आता पुढील दोन-तीन आठवड्यांनंतरही या समस्या कायम राहतात का, हे पाहावे लागेल, असे शहरातील डॉक्टरांनी सांगितले. समस्येचा कालावधी पाहावा लागेल तिसऱ्या लाटेत कोविडची लागण झालेले आणि त्यातून बरे झालेल्या काही रुग्णांना थकवा आणि अस्वस्थता जाणवत आहे. ही समस्या आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही दिसून आली. यापूर्वी एखाद्याला संसर्ग झाल्यास किमान १० ते १४ दिवस विलगीकरणात ठेवले जात होते; परंतु आता ४ ते ५ दिवसांत हे रुग्ण बरे होतात आणि विलगीकरणही सात दिवसांत संपते. त्यानंतर हे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले असले तरी वरील समस्या त्यांच्यात दिसून येत आहे. आता ही समस्या काही दिवस राहते की दीर्घकाळ राहते हे पाहावे लागेल, असे पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले. सध्या ओमिक्रॉन आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये थकवा, शरीरदुखी, विशेषत: पाठदुखीची समस्या दिसून येत आहे. बऱ्याच वेळा तापासह शरीरदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते, जी बरी होण्यास थोडा वेळ लागतो. सध्या याला पोस्ट कोविड समस्या म्हणणे खूप घाईचे आहे. ठोस निरीक्षणासाठी किमान तीन आठवडे वाट पहावी लागेल. त्यानंतर आणखी काय त्रास होतो हे समजेल. - डॉ. तृप्ती गिलाडा, संसर्गजन्य रोग विशेषज्ञ, मसिना रुग्णालय. तिसऱ्या लाटेत बाधित झालेले अनेक रुग्ण तपासणीसाठी ओपीडीमध्ये येतात. आजारपणानंतर अशक्तपणा, थकवा जाणवणे आणि डोकेदुखी किंवा शरीर दुखणे अशा समस्या त्यांच्यामध्ये आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मल्टीव्हिटॅमिन दिले जाते आणि पौष्टिक आहार घेण्यास सांगितले जाते. जेणेकरून त्यांचे आरोग्य सुधारेल. सध्या, कोणताही मोठा पोस्ट कोविड प्रभाव दिसून आलेला नाही. - डॉ. विद्या ठाकूर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com