पाताळगंगा नदी रेल्वे पुलावरील पत्र्यांना गंज
नागरिकांसाठी पदपथ धोकादायक; रंग लावण्याची मागणी
रसायनी ता. १३ (बातमीदार) : रसायनीतील चावणे ग्रामपंचायत हद्दीत कालिवली गावाजवळील पाताळगंगा नदीवरील पनवेल-रोहा दुसऱ्या रेल्वे मार्गावर नागरिकांना गुळसुंदे परिसरातील गावांकडे जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. या पुलावर लावण्यात आलेल्या पत्र्यांना गंज चढू लागला आहे. भविष्यात पत्रे कमकुवत होऊन मार्गाशेजारील पदपथ धोकादायक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पत्र्यांना रंग लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
चावणे, कासप, जांभिवली, सवणे कालिवली या चार गावांमधील आणि हद्दीतील चार आदिवासी वाड्यांतील नागरिकांना आपटे, गुळसुंदेकडे जाण्यासाठी पाताळगंगा नदीवर पूल नाही. यासाठी नागरिक चावणे येथील पाताळगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून किंवा जुन्या रेल्वे मार्गावरील पुलावरून जीव धोक्यात घालून जात असतात. याशिवाय खासगी वाहनांना पाताळगंगा एमआयडीसीच्या पुलावरून वळसा घालून जावे लागते. त्यासाठी आठ ते दहा किलोमीटर अंतर जास्त मोजावे लागत आहे. यात वेळ वाया जाऊन आर्थिक भुर्दंडही बसत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करताना रसायनीतील कालिवली गावाजवळ नदीवर पूल बांधताना मार्गिकेच्या दोन्ही बाजूने नागरिकांसाठी पदपथ बांधले आहे. तेव्हापासून पादचाऱ्यांना सोईचे झाले आहे. परिसरातील नागरिकांना जवळच्या अंतराने जाताना पुलाचा फायदा झाला आहे. मात्र, आता या पदपथाच्या पत्र्यांना गंज चढू लागला आहे. भविष्यात पत्रे कमकुवत होऊन पदपथ धोकादायक होईल, अशी शक्यता असल्याने त्यांना रंग लावण्यात यावा, अशी मागणी अतिरिक्त पाताळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष मारुती पाटील आणि इतरांनी केली आहे.