ठाण्यात हुक्का पार्लर, बारचा धंदा तेजीत
आमदार संजय केळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ ः कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरत असून त्याला वेसण घालण्यासाठी निर्बंध लागू झाले आहेत. नियम मोडणाऱ्यांविरोधातही ठाणे महापालिका कारवाईचा बडगा उगारत आहे. असे असले तरी ठाण्यात बेकायदा हुक्का पार्लर आणि बारचा धंदा तेजीत सुरू असून त्यांना कारवाईतून विशेष सूट मिळत असल्याची तक्रार आमदार संजय केळकर यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डान्स बार, हुक्का पार्लर, पब, परमिट रूम कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. मध्यंतरी लॉकडाऊन असताना रात्रभर सुरू असलेल्या डान्स बारचे स्टिंग ऑपरेशन करून त्याचा पर्दाफाश करण्यात केला होता. त्यानंतर काही अधिकऱ्यांवर जुजबी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा हे अवैध धंदे सुरू आहेत. रेल्वेस्थानक, वागळे इस्टेट, येऊर, घोडबंदर आदी भागांत कोरोनाचे नियम डावलून रात्रभर आणि पहाटे चार वाजेपर्यंत डान्स बार, पब, हुक्का पार्लर सुरू आहेत. काही वेळा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे या बाबी उघडकीस आणल्या जातात. त्यावर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून कारवाई होते, परंतु या प्रकरणी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे आमदार केळकर यांनी पत्रात म्हटले आहे.
कायद्याचे राज्य आहे का?
पेट्रोलिंग करणारे पोलिस कर्मचऱ्यांना अवैध धंद्यांची ही ठिकाणे माहीत असतात, तरीही त्यावर कारवाई केली जात नाही. कोणाच्या दबावाखाली ही कारवाई होत नाही? कोणाच्या संगनमताने हे व्यवसाय सुरू आहेत? हप्ते वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही? असे अनेक प्रश्न जागरूक नागरिकांना पडले आहेत. तक्रार करणाऱ्यांवरच दबाव टाकला जातो किंवा त्यांना मारहाण करून त्यांचा आवाज दाबला जातो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. एकूणच कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी शासनाने जनहितासाठी वेळीच अशा पोलिस अधिकाऱ्यांवरच कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.