तेलगळती बहाण्याने कारमधील रक्कम लंपास
एक लाख ७० हजाराची रक्कम लांबवली
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : कारमधून तेल गळत असल्याचे सांगून दोघांनी कोपरखैरणेत राहणाऱ्या एका व्यावसायिकाची दिशाभूल केली आणि कारमधील एक लाख ७० हजारांची रोख रक्कम असलेली बॅग चोरल्याची घटना सोमवारी भरदुपारी वाशीमध्ये घडली. वाशी पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अमित शेलार (२८) हा कोपरखैरणेत राहत असून त्याचे वाशीमध्ये मिठाई विक्रीचे दुकान आहे. अमित याचे चुलत बंधू प्रवीण कीर्तनकार असून गत सोमवारी त्यांना बेळगाव येथे कीर्तनासाठी जायचे होते. त्यासाठी अमित सोबत जाणार होते. प्रवीण दुपारी सानपाडा येथे अमितची वाट पहात उभे होते. तर अमित आपल्या इन्होवा क्रिस्टा कारने वाशीतील आपल्या मिठाईच्या दुकानाजवळून निघण्याच्या तयारीत होता. यावेळी चोरट्याने अमित व कारचालक अक्षयला कारमधून तेलगळत असल्याचे सांगून दिशाभूल केली.
तपासणीसाठी अमित व अक्षय कारमधून उतरताच दुसऱ्याने कारच्या मागील सीटवर १ लाख ७० हजाराची रोख रक्कम असलेली कीर्तनकार जयवंत शेलार यांची बॅग चोरून पलायन केले. दिशाभूल रक्कम चोरल्याचे लक्षात येताच त्यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.