पनवेल ग्रामीणमध्ये व्हॅक्सिन ऑन व्हिल्स
७ हजार नागरिकांना डोस देण्यात यश; पाडे, वाडीतील वंचितांनी घेतला लाभ
वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता. १३ : ''व्हॅक्सिन ऑन व्हिल्स'' उपक्रमाअंतर्गत पनवेलच्या ग्रामीण भागात सुमारे सात हजार नागरिकांचे लसीकरण केले आहे. याचा सर्वाधिक लाभ पाडे, वाडीत राहत असलेल्या नागरिकांना झाला आहे. बांधकाम मजूर, घरेलू कामगार आणि अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांनाही या उपक्रमाअंतर्गत लस देण्यात आली आहे.
काही कारणांमुळे केंद्रांवर न पोहोचू शकणाऱ्या किंवा अन्य कारणाने लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी हे अभियान राबविण्यात आले होते. पनवेल तहसील व सिप्ला कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ही संकल्पना राबवल्याचे पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी सांगितले. सिप्ला कंपनीची एक व्हॅन आणि डॉक्टरांसह सहा कर्मचाऱ्यांमार्फत हे लसीकरण गेल्या तीन महिन्यांपासून अविरत सुरू आहे. ''व्हॅक्सिन ऑन व्हिल्स''अंतर्गत परदेशी जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे नागरिक, ''यूपीएससी''चे विद्यार्थी, जिम प्रशिक्षक व शरीरसौष्ठवपटू, माध्यम कर्मचारी, पेट्रोल पंप कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी, झोपडपट्टी, अंथरुणाला खिळून असलेले नागरिक, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, दिव्यांग, वृद्धाश्रमातील वृद्ध, साधूसंत, तृतीयपंथी, देवदासी, पथारी व्यावसायिक आदींचा समावेश होता.
लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर झोपडपट्ट्यांतील नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे पनवेल तहसीलने ''व्हॅक्सिन ऑन व्हिल्स'' उपक्रमाअंतर्गत थेट झोपडपट्ट्यांमध्येच लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. १२ जानेवारीअखेर या उपक्रमाअंतर्गत ७ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
कसा आहे उपक्रम?
सिप्ला कंपनीने या उपक्रमा अंतर्गत एक व्हॅन लसीकरणासाठी दिली आहे. तहसील कार्यालयामार्फत त्यांना लस पुरवठा केला जातो. दररोज नियोजन करून ही गाडी विविध ठिकाणी जाऊन लसीकरण न झालेल्या नागरिकांना शोधून डोस दिले जाते. सिप्ला कंपनीने पुरवलेल्या डॉक्टरांसह सहा कर्मचाऱ्यांमार्फत हे लसीकरण तीन महिन्यांपासून अविरत सुरू आहे.
पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्यासाठी सिप्लाप्रमाणे परिसरातील अन्य मोठ्या कंपन्यांनी योगदान द्यावे. जेणेकरून वाड्या-पाड्यापर्यंत पोहोचता येईल आणि लसीकरण सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
- विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल