मिरा-भाईंदर पालिकेत कर घोटाळा
कागदपत्र पडताळणी न करताच आकारणी केल्याचे उघड
भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : कोणत्याही मालमत्तेला कर आकारणी करायची झाल्यास संबंधित मालमत्तेच्या संपूर्ण मालकी हक्काची कागदपत्रे महापालिकेकडे सादर करावी लागतात. कर आकारणी झाल्यानंतरही ही कागदपत्रे पालिकेच्या कर विभागाकडे उपलब्ध असतात. मात्र भाईंदर पश्चिम भागातील मोर्वा या गावातील एका सामायिक मालमत्तेचा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मालकी हक्कांच्या कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करताच कर आकारणी केली आहे. विशेष म्हणजे या मालमत्तेला कोणत्याही प्रकारची कर आकारणी झाली नाही, असे पालिकेने माहिती अधिकारात उत्तर दिले आहे. त्यामुळे यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त होत आहे.
मोर्वा गावालगत खोपरा या गावात उत्तन डोंगरी (खोपरा) खारभूमी लाभार्थी सहकारी संस्थेच्या मालकीची जमीन आहे. ही जमीन सामायिक मालकीची असल्याने जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर १०० हून अधिक भागधारकांची नावे समाविष्ट आहेत. असे असताना पालिका कर विभागाने या मालमत्तेच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांची पडताळणी न करताच केवळ एका व्यक्तीच्या नावे मालमत्ता करआकारणी केल्याचे उघड झाले आहे. यासंबंधीची कुणकुण लागताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेकडे माहिती अधिकारात कर आकारणी संदर्भात माहिती मागितली असता, या मालमत्तेला कोणत्याही प्रकारची कर आकारणी करण्यात आलेली नाही. तसेच कर आकारणीसंदर्भात कोणतीही कागदपत्रे कर विभागाकडे उपलब्ध नाहीत, असे दोन वेळा स्पष्टपणे लिहून दिले आहे. प्रत्यक्षात कर विभागातून या मालमत्तेला कर आकारणी झाली असून, त्याचे बिलच संस्थेच्या हाती पडले आहे.
कर आकारणी रद्द करा
विशेष म्हणजे खोपरा गावातील ही मालमत्ता सामायिक असून, मालमतेला कोणत्याही प्रकारची परस्पर कर आकारणी करू, नये असे पत्र संस्थेने पालिकेच्या कर विभागाला दिले आहे. तरीही कर विभागाने या पत्राची दखल न घेता कर आकारणी केल्याचे उघड झाले आहे. हे बेकायदेशीर काम करण्यासाठी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून, झालेली कर आकारणी तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
कर आकारणी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
- संजय शिंदे, उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका.