वाडा तालुक्यातील रस्त्याच्या कामांची चौकशी
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे कारवाईचे आदेश
वाडा, दि. १३ (बातमीदार) ः जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमताने आदिवासी भागातील रस्ते न करताच बोगस बिले काढली होती. अस्तित्वात नसलेल्या गावांमध्ये रस्ते बनवल्याने दाखवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता. याप्रकरणी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. याची दखल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत शिवक्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शरद यशवंत पाटील यांनी सा. बां. विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाने तक्रार केली होती. मंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊनही चौकशी होत नव्हती, म्हणून आदिवासी विकास संघर्ष समितीच्या पाच प्रमुख कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला संस्था-संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे हे उपोषण लक्षवेधी ठरले होते. आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी मोबाईलवरून चर्चा केली. बांधकाम विभागाचे सचिव सदा साळुंखे यांना या भागातील कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यांच्याबरोबरच राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी उपोषणस्थळी स्वतः भेट देऊन कार्यकारी अभियंता विजय सपकाळे यांना भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले; तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली.
मंत्री एकनाथ शिंदे, विवेक पंडित व प्रकाश पाटील यांच्या आश्वासनानंतर शासनाच्या वतीने रायगड सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता रा. मो. गोसावी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन याप्रकरणी एका महिन्याच्या आत चौकशी करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या हस्ते तीन दिवस सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरू केल्याने ठेकेदार व अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत. जव्हार सा. बां. विभागातील उघड झालेल्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब होईल, अशी प्रतिक्रिया संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
चौकट
पाच सदस्यांचा समावेश
सा. बां. प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी रायगडचे अधीक्षक अभियंता यांना लेखी पत्र देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशामध्ये त्यांनी अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना करावी असे म्हटले आहे. या समितीमध्ये संघर्ष समितीच्या पाचही सदस्यांचा समावेश करावा, अशी मागणी शरद पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
...तर पुन्हा आंदोलन
२० फेब्रुवारीपर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर २१ फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवक्रांतीचे अध्यक्ष शरद यशवंत पाटील यांनी या वेळी दिला.