महाराष्ट्र भवन राज्य सरकार उभारणार

महाराष्ट्र भवन राज्य सरकार उभारणार

महाराष्ट्र भवन राज्य सरकार उभारणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मंदा म्हात्रेंना आश्वासन सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. १३ : वाशी येथे सिडकोने उपलब्ध केलेल्या भूखंडावर राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र भवन उभारणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना याबाबत आश्वस्थ केले आहे. म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर रखडलेल्या महाराष्ट्र भवनाचा मार्ग मोकळा होणार आहे. नवी मुंबई शहराच्या निर्मितीनंतर सिडकोने वाशीतील भूखंड विविध राज्यांना दिल्याने वाशी शहरात विविध राज्यांचे भवन उभे राहिले आहेत. परंतु, महाराष्‍ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी वास्तू नसल्यामुळे मंदा म्हात्रे यांनी महाराष्ट्र भवनाचा आग्रह धरला. तसेच अविरतपणे पाठपुरावा करून सिडकोकडून वाशी येथे महाराष्ट्र भवनसाठी भूखंड आरक्षित करून घेतला आहे. या भूखंडासाठी सिडकोने बाजारभावाप्रमाणे तब्बल २६ कोटी रुपये अधिक कर असा मोबदला मागितला आहे. परंतु ही एक समाजोपयोगी वास्तू असून महाराष्ट्राची अस्मिता जागवणारी असल्याने नाममात्र दरात भूखंड उपलब्ध व्हावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. त्यावर अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा भूखंड सरकार ताब्यात घेऊन सरकारमार्फतच त्यावर महाराष्ट्र भवन उभारणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच त्यासाठी येत्या आठवडाभरात नगरविकासमंत्री, प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, नवी मुंबई महापालिका आयुक्त, तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. “महाराष्ट्र भवन” उभारण्यासाठी ८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ इतका भूखंड उपलब्ध करून देण्याचा समावेश करण्यात आला आहे. ---------------------------------------------- इतर राज्यांची भवने वाशी येथे उभी असून, आजतागायत महाराष्ट्र भवनाची वास्तू उभारण्यासाठी एक वीटही रचण्यात आलेली नाही. ही संपूर्ण नवी मुंबईकरांसह मलाही खंत आहे. रखडलेल्या या कामासाठी २०१४पासून पाठपुरावा करत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र भवन उभारणीस हिरवा कंदील दिला आहे. महाराष्ट्र भवननिर्मिती ही काळाची गरज असून, कोविड काळात याची उणीव प्रकर्षाने जाणवली. महाराष्ट्र भवन उभारणीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात आली आहे; परंतु ती रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. - मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com