कामगार रुग्णालयाचे काम रखडले
एमआयडीसीकडून एनओसीची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : अंधेरी एमआयडीसी येथील भीषण आगीत जळून खाक झालेले कामगार रुग्णालय तीन वर्षानंतरही सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे उपचारासाठी कामगारांची फरफट सुरू आहे. काही कामगारांना महागड्या खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालयातील ओपीडीचे काम पूर्ण झाले असून एमआयडीसीच्या विविध परवानग्यांमुळे ते सुरू होऊ शकले नसल्याचे कामगार विमा हॉस्पिटलचे महाराष्ट्राचे विभागीय संचालक प्रणय सिन्हा यांनी सांगितले. मंजुरी मिळताच १० दिवसांत ओपीडी सुरू करण्याची तयारी असल्याचेही सिन्हा पुढे म्हणाले.
एमआयडीसी परिसरातील ३९० खाटा असणाऱ्या कामगार रुग्णालयाला १७ डिसेंबर २०१८ रोजी लागलेल्या भीषण आगीत १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर १५४ नागरिक जखमी झाले होते. घटनेच्या तीन वर्षानंतर ही रुग्णालय सुरू झालेले नाही. यामुळे कामगारांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतूला यांनी सांगितले. रुग्णालय सुरू करणेबाबत प्रशासनाला अनेक पत्र दिली. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. आसपासच्या खासगी रुग्णालयांच्या दबावामुळे कामगार रुग्णलयाचे काम रखडवले तर जात नाही ना, अशी शंकाही मुतुला यांनी व्यक्त केली. रुग्णालय लवकर सुरू नाही केले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुतुला यांनी दिला आहे.
...
सहा महिन्यांपासून रखडपट्टी
रुग्णालयातील ओपीडी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी एमआयडीसी प्रशासनाचा ना हरकत दाखला लागणार आहे. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी अर्ज करण्यात आला आहे. यादरम्यान अनेक बैठका झाल्या, मात्र परवानगी मिळाली नसल्याने ओपीडी सुरू होऊ शकली नाही. याशिवाय रुग्णालयाच्या इतर बांधकामासाठीदेखील एमआयडीसी प्रशासनाचा ना हरकत दाखला आवश्यक असून तो मिळवण्याचा प्रयत्नदेखील सुरू असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
...