नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांना समस्यांचा विळखा
घणसोली पाणपोईच्या गळतीमुळे प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष
घणसोली, ता. १३ (बातमीदार) : कोट्यवधी रुपये खर्च करून सिडकोने नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांची निर्मिती केली आहे. इतर स्थानकांच्या तुलनेत त्यांची भव्यता आणि आकर्षक मांडणी केल्यामुळे ती नेहमीच सर्वांना आकर्षित करतात. मात्र, सध्या या रेल्वेस्थानकांची दुरवस्था झाली असून प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. घणसोली स्थानकात तर पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने धोकादायक झाली आहे. त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन या टाकीखालून जात आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
घणसोली हे नवी मुंबई शहरातील ट्रान्स हार्बर मार्गावरील एक मोठे रेल्वेस्थानक समजले जाते. या स्थानकावरून दैनंदिन हजारोंच्या संख्येत प्रवासी ये-जा करतात. नवी मुंबईत अनेक ठिकाणी पाण्याचा तोटा असताना घणसोली स्थानकात मात्र रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. रेल्वेस्थानकामध्ये बसविण्यात आलेल्या पाणपोईमध्ये गळती होत आहे. या पाणपोईसाठी असलेल्या टाकीखाली भुयारी मार्ग आहे. फलाट क्रमांक २ वरील या भुयारी मार्गातून पाण्याचा अपव्यय तर होतच आहे; मात्र गळणाऱ्या पाण्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. अनेक महिन्यांपासून होत असलेल्या गळतीमुळे पाण्याच्या टाकीची झीज होऊन ती कधीही कोसळेल, अशा अवस्थेत आहे. यात प्रवाशांचे जीवही जाऊ शकतो; परंतु रेल्वे प्रशासन व सिडको या समस्येकडे कानाडोळा करत आहे. प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेउन तातडीने त्याची दुरुस्ती करावी; अन्यथा हा भुयारी मार्ग कायमचा बंद करावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
घणसोली रेल्वेस्थानक क्रमांक २ वरील भुयारी मार्गात असलेली पाणी गळती समस्येसंदर्भात सिडको प्रशासनाशी संपर्क केला होता. मात्र, त्यांनी टाकी पूर्ण लिकेज असल्याने त्याला पर्याय नसल्याचे सांगण्यात आले.
- संजय सावंत, स्टेशन मास्टर घणसोली
घणसोली रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक २ वर असलेल्या टाकीला गळती लागली आहे. परिणामी, भुयारी मार्गावरील पाययांवर सतत पाणी गळती असती. यामुळे प्रवासी घसरून पडण्याची, तसेच पाण्यामुळे टाकीचा भाग खाली कोसळण्याची भीती आहे.
- सूरज बोरावके, प्रवासी
सीवूड्स स्थानकाची दयनीय अवस्था
घणसोली : सीवूड्स दारावे हे नवी मुंबईतील सर्वांत श्रीमंत रेल्वेस्थानकात गणले जाते. पण याच रेल्वेस्थानकाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. या स्थानकातील स्वच्छतागृहे बंद असल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. येथील पंखेही बंद असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
सीवूड्स दारावे रेल्वेस्थानकावरून दिवसाला हजारो प्रवासी, नागरिक ये-जा करत असतात. यात अबालवृद्ध आणि महिलांचाही समावेश असतो. बंद स्वच्छ्तागृहांमुळे नाईलाजाने प्रवाशांना स्थानकाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांचा पारा अधिकच चढला आहे. रेल्वेस्थानकातील पंखेही काही दिवसांपासून बंद आहेत. लवकरात लवकर या समस्यांवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि प्रवाशांना या गैरसोयीतून मुक्त करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीवूड दारावे रेल्वेस्थानकावरील पंखे आणि स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांचे विशेषत: वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांचे हाल होत आहेत. अडीअडचणीच्या वेळी पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा.
- कौस्तुभ मोरे, उपशहरप्रमुख, नेरूळ