नीतेश राणे यांच्या
जामिनावरील सुनावणी पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : कणकवली येथील मारहाण प्रकरणामुळे अडचणीत आलेले भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली. न्यायालय सोमवारी (ता. १७) या प्रकरणी निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, अशी फौजदारी फिर्याद नीतेश राणे आणि मनीष दळवी यांच्याविरोधात करण्यात आली. दोघांनी उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. ही तक्रार राजकीय हेतूने दाखल केलेली नाही आणि विधान भवन परिसरात घडलेल्या घटनेशी संबंधित नाही. ही घटना त्याच्या काही दिवसांपूर्वी घटना घडली होती, असा खुलासा विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी केला. यामध्ये वापरलेली गाडी भाड्याची आहे, अन्य आरोपी पुण्यातील आहेत. त्यामुळे त्यांना पैसे कुणी दिले, गुन्हेगारी कट कसा आखला, त्याचा तपास होणे आवश्यक आहे. दोन्ही आरोपींचा कोठडीतील ताबा आवश्यक आहे. या प्रकरणातील मोबाईल संभाषण आणि अन्य पुराव्यांवर तपास सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने आज यावरील सुनावणी पूर्ण केली असून निकाल सोमवारपर्यंत राखून ठेवला.
---
पोलिसांकडून जामिनास विरोध
मुख्य आरोपी आमदार असून स्थानिक पातळीवर प्रभावी व्यक्ती आहे. त्यांच्यावर एकूण सहा विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर केल्यास परिसरात तणाव निर्माण होईल, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. आरोपी दळवी बॅंकेचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत; मात्र घटनेच्या दिवशी ते परिसरात हजर होते, असा खुलासा सरकारकडून करण्यात आला.
---
पत्रकारांना सुनावणीस प्रवेश नाही
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या ऑनलाईन सुनावणी सुरू आहे; मात्र नीतेश राणेच्या सुनावणीसाठी पत्रकारांनी वारंवार प्रयत्न करुनही त्यांना बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस ऑनलाईन सुनावणीमध्ये प्रवेश मिळू शकला नाही.