भिवंडी-वाडा महामार्गावर खडी
वाहने घसरून अपघात होण्याची भीती
वाडा, ता. १२ (बातमीदार) ः वाडा-भिवंडी महामार्गावरील वाडा ते डाकिवली फाटा यादरम्यानच्या भागात स्थानिक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १०) श्रमदानातून खड्डे भरले आहेत; मात्र काही ठिकाणी खड्ड्यांत फक्त खडीच टाकल्याने त्यावर मुरूम किंवा जेएसबी न टाकल्याने वाहनांच्या जाण्या-येण्याने खड्ड्यातील खडी निघून इतरत्र पसरून दुचाकीचा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भिवंडी-वाडा हा रस्ता खड्ड्यात गेला असून खड्ड्यामुळे वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची अवस्था अशीच आहे. त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते; मात्र कायमस्वरूपी मार्ग काढला जात नाही. अनेक वेळा विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली; मात्र बांधकाम प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
अखेर या रस्त्यासाठी स्थानिक संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीने श्रमदानातून खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या सोमवारी (ता. १०) मोठमोठे खड्डे भरण्यात आले; मात्र काही ठिकाणी खड्ड्यांत फक्त खडीच टाकण्यात आली. त्यावर मुरूम किंवा जेएसबी न टाकल्याने आता वाहनांच्या जाण्या-येण्याने खड्ड्यातील खडी निघून ती रस्त्यावर इतरत्र पसरली आहे. त्यामुळे दुचाकी या खडीवर घसरून अपघात होण्याची भीती दुचाकीस्वार व्यक्त करीत आहेत; तर मोठ्या वाहनांच्या जाण्या-येण्याने टायरखाली खडी येऊन ती उडून दुचाकीस्वारांना लागून अपघात होण्याची भीती प्रवासी व्यक्त करीत आहेत.