कुत्र्याच्या मृत्युप्रकरणी पोलिसांत तक्रार
उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) : दुकानासमोर वावरणाऱ्या एका भटक्या कुत्र्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी प्राणिमित्र असलेल्या शिक्षिकेच्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दुकानदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
२६ सेक्शनमधील दुकानदार हरित देवनानी यांनी ६ जानेवारीला भटक्या कुत्र्याला मारहाण केली होती. मुका मार लागल्याने कुत्रा बाजूला तडफडत होता. ही माहिती ७ जानेवारीला स्थानिक महिला अनिता यादव यांनी प्राणिमित्र असणाऱ्या शिक्षिका सृष्टी सचदेव यांना सांगितली. सृष्टी सचदेव यांनी कुत्र्याला डॉक्टरकडे नेत त्याच्यावर उपचार करून त्याला देखभालीसाठी अनिता यादव यांच्याकडे ठेवले; मात्र ९ जानेवारीला कुत्र्याची प्रकृती बिघडल्याने त्याला दवाखान्यात नेले असता तिथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आज सृष्टी सचदेव यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दुकानदार हरित देवनानी याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
बदलापुरातील पशुसंवर्धन केंद्रात कुत्र्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यावर पुढील प्रक्रिया हाताळली जाणार अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.