२४ जानेवारीला विमानतळाचे काम बंद
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना निर्धार
पनवेल, ता. १३ (प्रतिनिधी) : राज्यात मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा हवा, यासाठी शिवसेना अडून बसली होती. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त अडून बसले आहेत. या विमानतळावरून विमान उडवायचे असेल, तर दि. बा. यांचे नाव द्यावेच लागेल, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पनवेल तालुक्यातील प्रकल्पग्रस्त कोल्ही कोपर गावात आयोजित भूमिपुत्र निर्धार परिषदेत केले. विमानतळाला दि. बां.चे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने घेतला नाही, तर २४ जानेवारीला विमानतळाचे काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामकरणासाठी रिपब्लिकन समाजाने १७ वर्षे आंदोलन केले होते. अखेर प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर नामकरणाला यश आले. नवी मुंबई विमानतळग्रस्तांनी आपला लढा कायम ठेवावा, असे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी प्रतिपादन केले. माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज (ता. १३) कोल्ही कोपर येथे भूमिपुत्रांची निर्धार परिषद आयोजित करण्यात आली होती, या वेळी ते बोलत होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, माजी खासदार संजीव नाईक, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रशांत ठाकूर, २७ गाव प्रकल्पग्रस्त समितीचे नेते, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
सिडको प्रशासन पोलिसांच्या मदतीने आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सिडकोने केलेल्या अन्यायाची चीड प्रकल्पग्रस्तांच्या मनात आहे. आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यास कोरोनाचे कारण सांगत आंदोलनाला परवानगी देत नाही. विमानतळाच्या नामकरणासाठी राज्य सरकार आणि सिडको प्रशासन कान बंद करून बसले आहे. राज्य सरकार दि. बा. पाटील यांच्या नामकरणाचा ठराव मांडत नाही, तोपर्यंत प्रकल्पग्रस्त शांत बसणार नाहीत. दि. बा. यांचे विमानतळाला नाव असणे, हा भूमिपुत्रांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले.