दाऊद इब्राहीमचा पुतण्या भारतात आणण्याआधीच फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाऊद इब्राहीमचा पुतण्या भारतात आणण्याआधीच फरार
दाऊद इब्राहीमचा पुतण्या भारतात आणण्याआधीच फरार

दाऊद इब्राहीमचा पुतण्या भारतात आणण्याआधीच फरार

sakal_logo
By
दाऊद इब्राहीमचा पुतण्या भारतात आणण्याआधीच फरार अमेरिकेतून पळून पाकिस्तानात गेल्याचा दावा सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १३ : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्यात मुंबई पोलिस आणि भारतीय तपास यंत्रणांना अपयश आले आहे. भारतात आणण्याआधीच अमेरिकेतील कोठडीतून फरार होत तो पाकिस्तानात गेल्याचा दावा करण्यात येत आहे. सोहेल अमेरिकेच्या फेडरल जेलमध्ये शिक्षा भोगत होता. नार्को टेररिजम कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. २०१८ पासून मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून भारत सरकार सोहेलला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याच्या सोबत अटक करण्यात आलेल्या दानिश अलीला काही वर्षांपूर्वी भारतात आणण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते; मात्र काही दिवसांपूर्वी भारतीय तपास यंत्रणांनी इंटरसेप्ट केलेल्या एका कॉलमध्ये सोहेल कासकर बोलत असल्याचे यंत्रणांना आढळून आले. त्यानंतर अमेरिकेच्या तपास यंत्रणांकडे भारतीय यंत्रणांनी सोहेल कासकरची चौकशी केली, तेव्हा सोहेल हा अमेरिकेतून पळाल्याचे आणि कदाचित पाकिस्तानात गेल्याचे त्यांना सांगण्यात आले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. २०१४ मध्ये सोहेल कासकर आणि दानिश अलीला आणखी दोन पाकिस्तानी नागरिकांसोबत स्पेनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अमेरिकेत ड्रग्जचा पुरवठा करणे, तसेच रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया या संघटनेला हत्यारे पुरवल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. २०१५ मध्ये त्यांना अमेरिकेत प्रत्यार्पित करण्यात आले. त्यांच्यावर अमेरिकेच्या फेडरल न्यायालयात खटला चालवला गेला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांना शिक्षा सुनावली गेली होती. पासपोर्टवरून गोंधळ सोहेल खान पकडला तेव्हा त्याच्याकडे भारताचा पासपोर्ट मिळाला होता. भारत आणि अमेरिकेत झालेल्या परस्पर कायदेशीर सहाय्य करारानुसार सोहेल खानला शिक्षा झाली तेव्हा त्याला भारताकडे सोपवायला हवे होते. भारताने तशी मागणीही केली होती; मात्र अमेरिकेने वेळकाढूपणा केला आणि सोहेल कासकर हा पाकिस्तानात पोहोचला, असे काही पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे; तर अटकेची कारवाई झाल्यानंतर सोहेल कासकरने अमेरिकेच्या तपास यंत्रणांना पाकिस्तानी पासपोर्ट दाखवल्याने त्याला भारताकडे सोपवण्यात आले नव्हते, अशी माहिती अमेरिकन तपास यंत्रणांनी दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. कोण आहे सोहेल कासकर? सोहेल कासकर हा दाऊद इब्राहीमचा भाऊ नुरा कासकरचा मुलगा आहे. तो १० वर्षांचा असताना नुरा कासकरसोबत भारतातून पळून गेला होता. त्यानंतर त्याने दुबई, स्पेन अशा अनेक देशांत बेकायदा ड्रग्ज विकणे, हत्यारे पुरवणे अशी कामे केली. दुबईत त्याला भारतीय दानिश अली भेटला. त्यानंतर दोघांनी मिळून ड्रग्जचा व्यवसाय सुरू ठेवला. दोघांना अमेरिकन तपास यंत्रणांनी २०१४ मध्ये सापळा रचून स्पेनमध्ये अटक केली होती. भारतात एकही गुन्हा दाखल नाही सोहेल कासकरवर भारतात एकही गुन्हा दाखल नाही; मात्र त्याचा काका दाऊद इब्राहिम मात्र मोस्ट वॉण्टेड असल्यामुळे भारताला त्याचा ताबा हवा होता. तो मिळाला असता तर दाऊदबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या असत्या, असे मत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top