हाफकिनचा औषधपुरवठा बंद
थकीत देयके मिळत नसल्याने विक्रेते आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. १३ : हाफकिन संस्था व वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने गेल्या तीन वर्षांपासून औषध पुरवठादारांची ९० कोटींची देणी थकवली आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही ही देयके मिळत नसल्याने, तसेच मागण्यांकडे काणाडोळा केला जात असल्याने औषध पुरवठादारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. देयके मिळत नाहीत तोर्यंत हाफकिन संस्थेला औषधे न पुरवण्याचा निर्णय औषध पुरवठादारांनी घेतला आहे.
कोरोना काळात रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी देयके थकीत असूनही औषध पुरवठा करण्यात आला; मात्र आता औषध पुरवठादारांनी पुरविलेल्या औषधांची रक्कम देण्याकडे हाफकिन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पुरवठादारांनी केला आहे. याबाबत पुरवठादारांनी सोमवारीच (ता. १२) हाफकिनला पत्र लिहून देयके न मिळाल्यास आत्मदहनाची परवानगी मागितली होती. आजदेखील औषध पुरवठादार असणाऱ्या साठ वर्षीय दक्षाबेन शाह या महिलेने हाफकिन, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक, जे.जे. रुग्णालय समूह आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. २०१५ पासून देयकांची रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार शाह यांनी केली आहे. अनेक औषध पुरवठादारांची थकीत देयके कित्येक वर्षांपासून रखडलेली आहेत. याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक औषध पुरवठादार रुग्णालयांना औषधे पुरवण्यास टाळाटाळ करत आहेत. थकीत देयकाबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे (डीएमईआर) संचालक व सरकारही शासन थकबाकीबाबत काहीही बोलत नसल्याने पुरवठादार मेटाकुटीला आले आहेत. हाफकिनसह ज्यांनी डीएमईआरकडे औषध पुरवठा केला आहे त्यांचे २०१९-२० पासून किमान ९० कोटी रुपये इतकी रक्कम थकीत आहे. सरकारलाही रक्कम देणे शक्य नसेल; तर नाइलाजाने आम्हाला आत्महत्या करायची पाळी येईल. त्यामुळे आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्व औषध पुरवठादारांकडून करण्यात आली आहे.
कोट
थकीत देयके मिळत नसल्याने औषध पुरवठादारांनी हाफकिन संस्थेला काळ्या यादीत टाकले आहे. देयके मिळत नाहीत तोपर्यंत हाफकिनला काळ्या यादीत ठेवले जाणार आहे.
- अभय पांडे, अध्यक्ष, फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन