मराठी पाट्यांवरून चर्चांना उधाण
--
दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्या मराठी भाषेत लावाव्यात, याबाबतची खिल्ली उडवणारे लोक मुळातच मराठीबद्दल मनात द्वेष बाळगून असतात. मराठीबद्दलच्या तिरस्कारातून ही गरळ ओकली जातेय. काही विद्वान तर जातिभेद, धर्मभेद तसा भाषाभेद समजून सरसकट मराठीची टर उडवत आहेत. इंग्रजी किंवा हिंदीला आमचा विरोध नाही, पण मराठीला कमी लेखणं, तिची टवाळी करणं, हे बांडगुळपणाचे लक्षण आहे. अशा गुलामी मनोवृत्तीचा निषेध करणे गरजेचे आहे.
प्रा. हरी नरके, ज्येष्ठ विचारवंत
---
मराठी माणसाला केवळ मराठीच वाचता येते, हा आत्मविश्वास कुठून येतो माहीत नाही, पण मुंबई मनपाची निवडणूक जवळ आली एवढा बोध नक्की होतो. अस्मितांचे हाकारे मतात रूपांतरित होतात. कोणी हिंदू अस्मितेचे, कुणी मुस्लिम अस्मितेचे; तर कुणी मराठी अस्मितेचा व्यापार करतो. पोट भरण्यासाठी यातलं काहीच उपयोगात येत नाही, हे कळणारी जनता तयार होईल, त्या दिवशी सगळ्यांचाच बाजार उठेल.
- विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते
----
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही मदत होणार का? तर अजिबात नाही. मराठी भाषेला प्रोत्साहन द्यायचे असेल तर मराठी शाळा वाचवा. मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करा. सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय म्हणजे केवळ बॉम्बेचे मुंबई करण्यासारखा आहे.
- सुमित राघवन, अभिनेता