((( लोगो ः कथु-करू मराठी)))
कॉमन इंट्रो ः
मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मराठी भाषा टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी काय करायला हवे, या प्रश्नांचा वेध घेण्यासाठी आम्ही भाषेच्या विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांना बोलतं केलं आहे. आजपासून सुरू झालेल्या मराठी संवर्धन पंधरवड्यात रोज एका व्यक्तीचे विचार ‘कथु-करू मराठी’ या सदरात वाचायला मिळतील.
...
गौरवाची भावना हवी!
आपली भाषा आपल्याला टिकवायची, वाढवायची असेल तर सर्वप्रथम ती आपण सातत्याने बोलली पाहिजे. मराठी माणसाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी बोलण्यात कमीपणा वाटता कामा नये. एकदा का आपल्या भाषेबद्दल आपल्या मनात गौरवाची भावना निर्माण झाली, की मग भाषा वाढायला सुरुवात होईल. सगळ्यांना मराठी समजत असते; मात्र आपणच अनेकदा हाय-हॅलो, हाऊ डू यू डू अशा इंग्रजीच्या फेऱ्यात अडकून पडतो. याच कारणाने आपल्या भाषेची दुरवस्था झाली आहे.
प्रत्येक मुलाचे प्राथमिक शिक्षण त्याच्या मातृभाषेत म्हणजे मराठीत व्हायला पाहिजे, पण आपली मुले आपण इंग्रजी माध्यमात घालत आहोत. ही मोठी चूक आहे. मुलांवर वाचनाचा संस्कार व्हायला हवा. मराठी विश्वकोशाची अध्यक्ष असताना मी त्या कोशाला कोशातून बाहेर काढून विश्वात आणले. त्यासाठी तब्बल १८० ग्रंथवाचन स्पर्धा घेतल्या. सध्या वाचू आनंदे प्रकल्पावर काम करीत आहे आणि ११० पुस्तके येत आहेत. आपल्या घरात आपण पुस्तके आणली पाहिजेत, तरच मुले पुस्तक वाचू लागतील. आपल्या प्रकाशकांनीसुद्धा चांगल्या चित्रांची, चांगल्या अक्षरांची, चांगल्या मांडणीची पुस्तके निर्माण करायला हवीत.
आपल्या विमानतळावर मराठीतून उद्घोषणा होते; मात्र आपण मराठी माणसेच तेथे मराठीतून बोलायला लाजतो आपण आपली ही वृत्ती सोडून दिली पाहिजे. सरकार सकारात्मक काम करीत आहे. आपण सरकारकडे भाषेसाठीचे उपक्रम घेऊन जायला हवे. सरकारने मराठी पाट्यांचा निर्णय घेतला तो खूपच चांगला आहे.
- डॉ. विजय वाड, ज्येष्ठ लेखिका, मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष