दुर्गा गुडिलू यांना बजाज पुरस्कार
मुंबई, ता. १५ ः इंडियन मर्चंट्स चेंबरच्या महिला शाखेतर्फे दिला जाणारा २०२१ चा जानकीदेवी बजाज पुरस्कार दुर्गा मल्लू गुडिलू यांना मिळाला. कोविडयोद्धा म्हणून उत्तम काम केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला.
पुरस्काराचे हे २८ वे वर्ष आहे. दुर्गा या वैदू समाजाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्या असून त्या अनुम फाऊंडेशनच्या विश्वस्त आहेत. महाराष्ट्र वैदू विकास समितीमार्फतही त्या शिक्षण, आरोग्य, पोषण, पर्यावरण, रोजगारनिर्मिती आदी क्षेत्रांमध्ये वेगवगेळी कामे करतात. कोविडकाळात श्रीमती दुर्गा यांनी वेगवेगळ्या प्रकारे समाजाची तसेच कोविडबाधितांची सेवा केली. बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांच्याहस्ते त्यांना गौरविण्यात आले.
रोजंदारीची कामे करणाऱ्या वैदू समाजाला कोविडकाळात रोजगार व रोजचे जेवणही मिळणे कठीण झाले. त्यावेळी गरजूंना अन्नधान्य, औषधे व अन्य जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी श्रीमती दुर्गा यांनी धडपड सुरू केली व हजारो कुटुंबांना साह्य केले. त्याचप्रमाणे त्यांनी समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम व जनजागृती मोहीमही सुरू केली. वंचित मुलांना ई-शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ‘मेरा शिक्षण’ योजनेचा लाभ साडेचारशे मुलांना झाला. त्याचबरोबर त्यांनी वीस हजार मुलांना मध्यान्न आहार, तसेच पंधरा हजार मुलींना सॅनिटरी नॅपकीन पुरवून त्यांची काळजी घेतली.
...