निर्बंधांचा क्रीडा क्षेत्राला फटका
विरार, ता. १५ (बातमीदार) ः कोरोना निर्बंधाचा सर्वाधिक फटका क्रीडा क्षेत्राला बसला आहे. मार्च २०२० पासून सरकारने जेव्हा जेव्हा लॉकडाऊन आणि निर्बंध कडक केले तेव्हा तेव्हा क्रीडा क्षेत्र पूर्णपणे बंद करण्यात आले. सरकारने पुढे कोरोना रुग्ण संख्या पाहून हळूहळू निर्बंध शिथिल केले. त्यामध्ये मॉल, दुकाने, रेल्वे, कारखाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र प्रत्येक वेळी निर्बंधांमधून दिलेल्या सूटमधून क्रीडा क्षेत्राला वगळण्यात आले. मागील दीड वर्षांपासून क्रीडा क्षेत्रावर होत असलेल्या अन्यायामुळे खेळाडूंना स्पर्धांत सहभागी होता येत नाही. अनेक खेळाडूंची स्पर्धेत सहभागी होण्याची वयोमर्याद संपत आहे. त्यामुळे खेळाडू मानसिक तणावात असून निर्बंधामधून क्रीडा क्षेत्राला वगळण्याची मागणी करत आहेत.
कोरोना निर्बंध घोषित करताना राज्य सरकारकडून क्रीडा क्षेत्राचा कोणताही विचार केला जात नाही. सरसकट सर्व खेळ, जिम, योगा, स्विमिंग पूल, मैदाने बंद केली जातात. जे खेळाडू अनेक वर्षे मेहनत घेऊन सराव करतात, मैदाने बंद झाली तर त्या खेळाडूंचा सरावावर परिणाम होतो. सरकारच्या परवानगीने हॉटेल्स, मॉल ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाते. मात्र क्रीडा क्षेत्राला कोणतीही सूट मिळत नाही. या निर्बंधांमुळे अनेक खेळाडूंचे करिअर समाप्त होत आहे. त्यामुळे इतर क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्रात देखील सूट देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
निवडणूक काळात कोरोना पसरत नाही. तेव्हा कोरोना नियम लागू होत नाहीत. मात्र, क्रीडा स्पर्धांसाठी तसेच खेळाडूंना सराव करताना मात्र कोरोना नियम लागू होतात. हे चुकीचे आहे. सरकारने खेळाडूंचा विचार करून मैदाने खुली करावी. स्पर्धा आयोजित करण्यासाठी परवानगी द्यावी.
- अमन चौधरी, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स.
निर्बंधाचा फटका खेळाडूंना बसतो आहे. निर्बंधामुळे खेळाडूंसोबत त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांची परिस्थितीही हलाखीची बनली आहे. त्यामुळे सरकारने प्रशिक्षकांना आर्थिक मदत द्यावी.
- संतोष पिंगुळकर, प्रशिक्षक, स्पोट्स अकॅडमी.