वन्यप्राण्यांची तस्करी, वणवे, शिकार,चिंताजनक बाब,जनजागृतीची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन्यप्राण्यांची तस्करी, वणवे, शिकार,चिंताजनक बाब,जनजागृतीची गरज
वन्यप्राण्यांची तस्करी, वणवे, शिकार,चिंताजनक बाब,जनजागृतीची गरज

वन्यप्राण्यांची तस्करी, वणवे, शिकार,चिंताजनक बाब,जनजागृतीची गरज

sakal_logo
By
वन्यजीव, वनसंपदेची शिकार वाढती तस्करी चिंताजनक बाब; जनजागृतीची गरज अजित शेडगे नैसर्गिक वनसंपदा आणि विविध प्राणी, पक्ष्यांच्या अधिवासाने माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा व कोकणातील भाग समृद्ध आहे. दक्षिण रायगड विभागात वन विभागाच्या वतीने गेल्या सहा महिन्यांत वन्यप्राणी तस्करी प्रकरणात चारहून अधिक कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये दुर्मिळ खवले मांजर तस्करांपासून वाचवण्यात वन विभाग आणि वन्य प्राणीप्रेमींना यश आले. वन्यजीवांची वाढणारी तस्करी, शिकार, वणवे या बाबी प्रकर्षाने समोर येत असून ती चिंताजनक बाब आहे. या तस्करी, वणवे व शिकारीबाबत कठोर कारवाई, जनजागृती करणे आवश्यक झाले आहे. .......................... सह्याद्रीच्या रांगा, विपुल जंगल आणि नद्या-नाल्यांची समृद्धता ही या तालुक्यांची ओळख आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांचे सानिध्य, वाढते आधुनिकीकरण, शहरीकरण, बदलणारी शिक्षण व्यवस्था आणि बदलते राहणीमान वन्यप्राण्यांच्या जीवावर उठले आहे की काय? अशी शंका घेण्यास काही वर्षांपासून वाव निर्माण झाला आहे. या तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या तस्करीच्या घटनाही वाढल्या आहेत. यामध्ये प्रकर्षाने खवले मांजर आणि विविध प्रकारचे दुर्मिळ साप यांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत लागणारे वणवे, भरमसाठ वृक्षतोड, शिकार आणि विकासाच्या नावाखाली डोंगरांचे होणारे उत्खनन यामुळे वन्यप्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. यातूनच जंगलात जे प्राणी तग धरून आहेत, त्यांच्या जीवावर तस्कर उठले आहेत. स्वार्थासाठी आणि झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी करत आहेत. गेल्या वर्षी माणगाव येथे ९ फेब्रुवारीला मांडूळ तस्करी करणाऱ्या टोळीला वन विभागाने अत्यंत कौशल्याने व शिताफीने अगदी धूम स्टाईलने कारवाई करत पकडले. त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचे दोन दुर्मिळ मांडूळ जप्त केले. काही दिवसांपूर्वी वनविभागाने महाड तालुक्यात कारवाई करून तस्करी होणाऱ्या खवले मांजराची सुटका केली. अतिशय शांत व निशाचर असणारे खवले मांजर अलीकडे मोठ्या प्रमाणात तस्करांच्या निशाण्यावर असून दुर्मिळ असणारा हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यातील खवले मांजर याचा भारतीय वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ नुसार वर्गीकरण १ यामध्ये समावेश आहे. म्हणजेच जे संरक्षण वाघांना दिलेले आहे, तेच स्थान खवले मांजरानाही आहे. निसर्ग संवर्धन जागतिक संघटनेने धोक्यात असलेल्या या प्राण्याचा समावेश लाल यादीत केला आहे. याचाच अर्थ अतिशय दुर्मिळ गटातील हा प्राणी आहे. आपल्या संपूर्ण शरीराच्या २० टक्के वजन खवल्यांचे असलेला हा प्राणी औषधी आहे. अशी अनेकांची धारणा आहे. याची खवले चिनी औषधामध्ये वापरली जातात. त्यामुळे जागतिक पातळीवर या प्राण्यांची शिकार आणि तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. नुकतेच माणगाव तालुक्यातील टोल खुर्द या ठिकाणी खवले मांजराची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना वन विभागाने कारवाई करत ताब्यात घेतले. महाड व भोर वन विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटना या चिंताजनक आणि दुर्मिळ वन्यप्राण्‍यांचे जीवन धोक्यात असल्याचे सिद्ध झाले आहे. दक्षिण रायगडातील तालुक्यात अजूनही बऱ्यापैकी जंगल बाकी आहेत. याच जंगलात दुर्मिळ वन्यप्राणी आढळून येतात. यामध्ये खवले मांजर, कासव, मांडूळ यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी मुबलक प्रमाणात दिसणारे हे प्राणी आजघडीला अगदी दुर्मिळ झाले आहेत. तालुक्यात याच प्राण्यांच्या तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. वन्य प्राणी समृद्ध वनसंपदेची साक्ष देतात. मात्र, आजमितीस त्‍यांची वाढलेली तस्करी पाहता भविष्यात लवकरच या प्रजाती जंगलातून नाहीशा होतील. यासाठी वन्यप्राण्यांच्या संवर्धनाच्या जागृतीची गरज कधी नव्हे ती निर्माण झाली आहे. संरक्षित वन्यप्रजातीत वाढ आणि वन्यप्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. या कायद्याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी व्यापक अभियानाची गरज निर्माण झाली आहे. मांडूळ अंधश्रद्धेचा बळी औषधी नसले तरी अंधश्रद्ध आणि गुप्तधनाच्या लालसेपोटी अनेक तांत्रिक मांत्रिक मांडूळ साप मिळवून त्याच्यावर तंत्रमंत्र करत असतात. बिनविषारी असलेल्या या सापाच्या पूजेने पैशांचा पाऊस पडतो. घरात धनदौलत, बरकत येते. हा साप खजिना शोधून देतो. असे एक ना अनेक गैरसमज मांडूळ सापाविषयी आहेत. त्यामुळे अंधश्रद्धेतून या सापाला मागणी आहे. यातूनच या सापाच्या तस्करीचे प्रमाण वाढते आहे. स्थलांतरीत पक्षी धोक्यात थंडीच्या दिवसांत दक्षिण रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दुर्मिळ पक्षी येतात. गैरसमजातून व भक्ष्य म्हणून या पक्ष्यांची शिकार होत आहे. वणव्यांमुळेही प्राणी-पक्षी धोक्यात आले आहेत. उन्हाळी दिवसात लागणारे वणवे व शिकारीचे प्रमाण वाढत आहे. वणव्यांमुळे तर अनेक स्थलांतरित पक्ष्यांनी आपला अधिवास बदलला आहे. स्थानिक तरुण जाळ्यात वन्यप्राण्यांच्या या तस्करीत मोठी आर्थिक उलाढाल दडलेली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले तस्करीचे जाळे मोठ्या षङ्‍यंत्राचा भाग आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील तरुण आणि गरजू लोकांना पैशाचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून तस्करीचे गैरकृत्य करवून घेतले जाते. मुख्य सूत्रधार व दलाल यात कोठेही पडद्यावर येत नाहीत. जेव्हा पोलिस कारवाई होते, किंवा तस्करीचा भांडफोड होतो त्या वेळी स्थानिक प्राणी पकडणारा थोड्याशा पैशात फसतो. पकडल्यानंतर त्याला दलालांचे नाव माहिती किंवा कोणत्या सूत्रधाराचा पत्ता माहीत नसल्याने सबल पुराव्यानिशी पकडल्यामुळे त्यालाच तुरुंगाची हवा खावी लागते. या तस्करी प्रकरणात अडकलेले अनेक तरुण आजही तुरुंगातून आहेत. त्यांना ना कोणी विचारत, ना कोणी मदतीचा हात देत. त्यामुळे या तस्करी प्रकरणात जिल्ह्यातील अनेक संसार उद्‍ध्वस्त झाले आहेत. --------------------------------------------- तस्करीत देशातील सर्वाधिक बळी जाणारा खवले मांजर हा प्राणी आहे. त्याचबरोबर चोरट्या शिकारीमध्ये इतर वन्यजीवही बळी जातात. जिल्ह्यातील अनेक भागांमधून सातत्याने तस्करी कारवाया समोर येतात. त्या भागांतील वनविभागाच्या राखीव जंगलांचा दर्जा सुधारणे, खवले मांजर आणि इतर वन्यजीवांसाठी संरक्षित राखीव वन म्हणून संरक्षित करणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा तस्करीमध्ये सापडलेल्या वन्य प्राण्यांचे सुरक्षित पुनर्वसन करणे शक्य होईल. शिवाय, या राखीव वनासाठी ''वाइल्ड लाईफ पेट्रोलिंग टास्क फॉर्स''ची नियुक्ती करणेही गरजेचे झाले आहे. तरच या वन्यजीवांना कायमचे संरक्षण लाभेल आणि त्यांची वीण संख्या वाढीस लागेल. - प्रेमसागर मेस्त्री, मानद वन्यजीव रक्षक सद्यस्थितीत जंगलात वाढलेले गवत हे वन्यजीवांसाठी अतिशय उपयोगी आहेत. कारण हे गवत वन्यजीवांना लपण्यासाठी आणि उपजीविका भागवण्यासाठी उपयोगी आहे. परंतु, याच वन्यजीवांच्या शिकारीसाठी जंगलात वाढलेल्या गवताला वणवे लावले जातात. यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. - राम मुंढे, पक्षीमित्र, अभ्यासक
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top