संपामुळे १२०० कोटींचा फटका
कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : सरकारमध्ये विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अडीच महिन्यांपासून संप पुकारला आहे. अनेक कर्मचारी आता कामावर रुजू होत आहेत. मात्र संपामुळे एसटी महामंडळाला सुमारे १२०० कोटींचा तोटा झाल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. शिवाय संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना वाहतुकीची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी एसटीचे सेवानिवृत्त व कंत्राटी पद्धतीवर चालक नेमण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले
सोमवारी (ता. १०) सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनामुळे आशादायक चित्र निर्माण झाले असून रोज सुमारे ४०० कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. कामगारांमधील सकारात्मक बदलामुळे कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यभरातील २५० आगारांपैकी २१५ आगारांतून वाहतूक सुरू झाली आहे. कामावर रुजू होण्याबाबत कामगारांकडून विचारणा केली जात असून, कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचेही चन्ने यांनी सांगितले.
एसटीचे अध्यक्ष अनिल परब, तसेच एसटी महामंडळ प्रशासनाकडून कामावर हजर राहण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला न जुमानता संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्ती करण्यात आली असून ३,१२३ कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
२६ हजार ५०० पर्यंत कर्मचारी परतले
एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याच्या केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २६ हजार ५०० पर्यंत कामगार रुजू झाले असून गुरुवारी २१५ आगारांतून २,३८२ बसेस रस्त्यावर धावल्या. सुमारे ७,१३८ फेऱ्यांमधून सुमारे ४ लाख प्रवाशांनी प्रवास केला.
कोट
पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नागपूर आणि भंडारा येथील आगारांत मिळून ४०० कंत्राटी चालक नेमण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत सेवानिवृत्त ४०२ चालकांचे अर्ज आले असून त्यापैकी ९१ चालक पात्र ठरले आहेत. दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांना पूर्वीप्रमाणे वाहतुकीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व कामगारांनी कर्तव्यावर रुजू व्हावे. रुजू झाल्यानंतर चर्चेतून मार्ग काढला जाईल.
- शेखर चन्ने,
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक.