नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर गुन्हा
ठाणे जिल्ह्यात ७ फिरक्या; ४६ रिळ जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : नायलॉन मांजाला बंदी असूनही ठाणे जिल्ह्यात सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे. उल्हासनगर, डोंबिवलीत नायलॉन मांजा विकणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी २२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उल्हासनगरातील गोल मैदान येथील भारत पतंगवाला या दुकानात नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहानिशा करून छापा टाकला; तर शहरातील हॉस्पिटल एरिया येथे रहिवासी व दुकानदार बुरो डोलनदास वासवानी (४८) हे नायलॉन मांजा विक्री करत असताना आढळून आले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या रंगाचा नायलॉन मांजा असलेल्या ७ लाकडी फिरक्या व ४६ रिळ असा एकूण १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट
डोंबिवलीतही १६ रिळ जप्त
विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कल्याण गुन्हे शाखेनेही बेकायदा नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी कारवाई केली. डोंबिवली, महात्मा फुले रोड येथील शिवाजी धर्मा जाधव (५२) यांच्या राहत्या घरी छापा टाकून त्यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजा असलेले एकूण १६ रिळ जप्त केले. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई कल्याणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ, सहायक पोलिस निरीक्षक भूषण एम. दायमा, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी केली.