वसई-विरार महापालिकेचा महिला व बाल कल्याण विभाग अव्वल
संदीप पंडित, प्रसाद जोशी
राज्यातील ज्या महापालिका महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करतात, त्या समित्यांना अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र महापौर परिषेदेकडून पुरस्कार देण्यात येतो. यात ‘ड’ वर्गातील महापालिकांमधून वसई-विरार महापालिकेने प्रथन क्रमांक पटकावला आहे. महिला बाल कल्याण समितीच्या कामांचे निकष पाहून संस्थेने २०१७-१८ या वर्षासाठी पालिकेला प्रथम क्रमांक दिला आहे. विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, याकरिता चांगले काम केल्याची पोचपावती महिला व बाल कल्याण समितीमुळे पालिकेला मिळाली आहे.
देशातील सर्व राज्यांमधील विविध महापालिकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून उत्तम काम करणाऱ्या विभागांना अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिखर संस्थेतर्फे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक वर्षी केल्या जाणाऱ्या कामगिरीचा विचार या पुरस्कारांसाठी होतो. महाराष्ट्रातील एकूण २७ पालिकांमधील सर्व विभागांच्या कामगिरीचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठीचे पुरस्कार जाहीर केले जातात. २०१७-१८ या वर्षीच्या पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट महिला व बालकल्याण विभागासाठीचा पुरस्कार वसई-विरार महापालिकेला मिळाला. पालिकेच्या महिला-बालकल्याण विभागाची जबाबदारी माया चौधरी सांभाळत असून त्यांनी राबवलेल्या अनेक अभिनव उपक्रमांची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली. वसई-विरार पालिकेसह बृहन्मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या महापालिकांच्या कामगिरीलाही पुरस्काराची दाद मिळाली आहे.
कामांचा लेखेजोखा
महिला, बालकल्याण समितीच्या माध्यमातून पालिकेने आधारमाया योजनेतून कृष्ठरोग बाधित पुरुष, महिला, मुलांना तसेच ६० वर्षांवरील एकाकी महिलांच्या उपजीविकेकरिता मासिक अनुदान, उत्तरदायी योजनेतून गतिमंद मुलांच्या देखभालीसाठी, सुखदायिनी योजनेतून कुटुंबप्रमुख ७५ टक्के अपंग असल्यास त्यांच्या १४ वर्षांखालील मुलांना मासिक अनुदान दिले आहे; तर महिला, युवक, युवती व ज्येष्ठ नागरिकांना डायलेसिस उपचारासाठी तसेच कर्करोगबाधित महिलांना जीवनदायी योजनेतून लाभ मिळवून दिले. तसेच निराधार, अंध, अपंगांना विवाहाकरिता आर्थिक मदत देण्यात येत आहे. त्यामुळे हे सर्व निकष, कामाची पद्धत पाहून वसई-विरार पालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
महिला व बाल कल्याण समितीद्वारे विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा म्हणून प्रयत्न केले जातात. पहिली महापालिका असेल जी अर्थसंकल्पात या समितीकरिता पाच टक्क्यांहून अधिक निधीची तरतूद करते. कोरोना काळात शिक्षणासाठीदेखील मदत केली जात आहे. पालिका अव्वल आली तरी यात कर्मचारी वर्गाचीदेखील तितकीच मेहनत आहे.
- चारुशीला पंडित, उपायुक्त, महिला व बाल कल्याण समिती.
महिला आणि लहान मुलांच्या विकासाचे काम महत्त्वाचे असते. वसई-विरार महापालिका नेमकी याच गोष्टीवर लक्ष देत आहे आणि त्याची दखल एवढ्या मोठ्या स्तरावर घेतली जाते, हे खरंच अभिमानास्पद आहे. पुरस्काराबद्दल महापालिकेचे अभिनंदन.
- क्षितीज ठाकूर, आमदार, बहुजन विकास आघाडी