झाडांची छाटणी, विल्हेवाटीसाठी
सात कोटींचा अधिक खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : धोकादायक झाडांची छाटणी करणे, पावसाळ्यात पडलेली झाडे उचलून त्याची विल्हेवाट लावणे, अशा कामांसाठी महापालिकेने ७४ कोटी रुपयांचा खर्च करून कंत्राटदारांची नियुक्ती केली होती. आता या खर्चात सात कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तसा प्रस्ताव प्रशासनाने वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडला आहे. गेल्या वर्षी आलेल्या तौत्के वादळामुळे हा खर्च वाढला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
महापालिकेने जून २०१९ मध्ये दोन वर्षांसाठी प्रत्येक विभागात कंत्राटदारांची नियुक्ती केली. महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा १५ ते २५ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवून कंत्राटदारांनी हा ठेका मिळवला होता. या कंत्राटाची मुदत जून २०१२१ मध्ये संपणार होती. त्यानंतर नव्या कंत्राटदारांची नियुक्ती होणे गरजेचे होते; मात्र पालिकेने जुन्याच कंत्राटदारांची नियुक्ती केली होती. त्यानंतर तौत्के वादळामुळे पालिकेकडे झाडांबाबत तब्बल तीन हजार ५७ तक्रारी आल्या होत्या. जुन्याच कंत्राटदारांनी ही पडलेली झाडे, फांद्या उचलल्या होत्या. तसेच इतरही काही कामे करण्यात आली. त्यामुळे महापालिकेला सात कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. तसा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.