वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः मुंबईतल्या ग्रँटरोड परिसरात जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या तीन बांगलादेशी तरुणींची मुंबई पोलिसांनी सुटका केली आहे. तिघीही बेकायदेशीर मार्गाने भारतात आणल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांचा तपास करण्यात येत आहे. तिन्ही महिलांसह त्यांच्या मॅनेजर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतल्या डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप खुडे यांना माहिती मिळाली होती की, ग्रँटरोडच्या सिम्प्लेक्स इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू आहे. तिथे बांगलादेशी तरुणींना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला. एक बनावट गिऱ्हाईक तयार करून त्याला त्या इमारतीत शहानिशा करण्यासाठी पाठवण्यात आले. तोपर्यंत पोलिस पथक दबा धरून बसलेले होते. ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहक जेव्हा तिथल्या मॅनेजरला पैसे देऊन रूममध्ये गेले, तेव्हा त्याने पोलिस पथकाला इशारा केला. तेव्हा पथकाचे नेतृत्व करणाऱ्या पोलिस निरीक्षक सणस यांनी पथकाला घेऊन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा टाकला.
तेव्हा गिऱ्हाईकांना शोधून आणणारी महिला, तिथली मॅनेजर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायासठी तिथे राहत असलेल्या मुली आणि महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तिन्ही बांगलादेशी महिला आणि त्यांची मॅनेजर लक्षी गायकवाड यांच्यावर स्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमानुसार दाखल करण्यात आला आहे.