मराठी पाट्या असाव्यात पण हिंदी इंग्रजी भाषेतील पाट्यां ना विरोध नको - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मराठी पाट्या असाव्यात पण हिंदी इंग्रजी भाषेतील पाट्यां ना विरोध नको - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मराठीसह हिंदी, इंग्रजीतही पाट्या असाव्यात रामदास आठवले ः मराठी व्यावसायिकांची दुकाने वाढवण्याचे सरकारला आवाहन सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ : दुकानांवर मराठी भाषेतील नावाच्या पाट्या असाव्यात; मात्र त्यासाठी राष्ट्रभाषा हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील नावाच्या पाट्यांना विरोध करणे योग्य नाही. तसेच मराठी पाट्यांचा आकार आणि इंग्रजी भाषेतील पाट्यांचा आकार यावरून भाषिक भेदभाव करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले. याआधी राज ठाकरे यांनी दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात याचा आग्रह धरला. आता मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्वांत आधी भूमिका घेत मराठी पाट्यांचा विषय आणला असून त्यासाठी राज्य सरकारने तसा कायदा केला आहे; मात्र दुकानांवरील पाट्यांचा आकार लहान-मोठा ठरवल्यामुळे मराठी भाषेला मोठेपणा मिळेल असा विषय नसून मराठी भाषा ही मुळातच मोठी आणि श्रेष्ठ आहे. आम्हालाही आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे; मात्र मुंबईत येणारे परप्रांतीय नागरिक; परदेशी पर्यटक यांना मराठीसह इंग्रजी पाटी सोयीची ठरते. इंग्रजी पाटी नसेल तर मुंबईत व्यापारातून जी मोठी आर्थिक उलाढाल होते त्यावर याचा परिणाम होईल. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी, हिंदी सर्व भाषांतील पाट्या असाव्यात, असे आठवले म्हणाले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई सर्वांना सांभाळून घेते. त्याप्रमाणे दुकानांवरील मराठी आणि अन्य भाषेच्या पाट्यांचा वाद थांबवून मराठीसोबत इंग्रजी भाषेतही पाट्या लावाव्यात. त्यातील कोणत्या भाषेचा आकार छोटा आणि मोठा असा भेद कोणी करू नये, असे आठवले म्हणाले. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी, मराठी माणसांच्या आर्थिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासनाने विधायक कामे करावीत. दुकानांवरील पाट्या मराठी असण्यासाठी आणि त्या पाट्यांवरील मराठी अक्षरे मोठी असण्यासाठी शिवसेना आणि राज्य शासनातील महाविकास आघाडी जो आटापिटा करीत आहे, त्यापेक्षा मराठी माणसांची त्यांच्या मालकीची दुकाने मुंबईत कशी वाढतील, मराठी माणूस कसा व्यापार-उद्योगात मोठा होईल याकडे अधिक लक्ष द्यावे, असा टोला आठवले यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com