उच्च शिक्षणात ‘अकॅडमिक क्रेडिट बँक प्रणाली
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परिपत्रक जारी
मुंबई, ता. १५ : विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम स्वत: ठरवता यावा यासाठी देशातील विद्यापीठात आणि एकूणच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आता ‘अकॅडमिक क्रेडिट बँक’ (एबीसी) प्रणाली सुरू केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने परिपत्रक जारी केल्याने ‘एबीसी’ची अंमलबजावणी बंधनकारक ठरणार आहे.
विद्यार्थ्यांला त्याचा अभ्यासक्रम स्वत: ठरवून त्याला कोणत्याही महाविद्यालयांतून उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी ‘एबीसी’ची चाचपणी काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. त्यातील अडचणी समोर न आल्याने आता ‘एबीसी’ची अंमलबजावणी देशभरात केली जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना एका वेळी अनेक अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. म्हणजे विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला इतिहासाचा अभ्यास करावयाचा झाल्यास तो पर्याय त्याला या माध्यमातून खुला होणार आहे. तसेच विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेत पाहिजे तो विषय, तो शिकत असलेल्या संस्थेत उपलब्ध नसेल तर तो दुसऱ्या संस्थेत जाऊनही हे शिक्षण घेता येणार आहे. याशिवाय जर विद्यार्थ्याला काही काळ थांबून एखादा वेगळा अभ्यासक्रम किंवा स्टार्टअप असे काही करायचे असेल तर तो ‘नॅशनल अकॅडमिक क्रेडिट बँक’मध्ये नोंद करून अभ्यासक्रमातून काही काळ सुट्टी घेऊ शकतो. तसेच जेव्हा तो विद्यार्थी परत अभ्यासक्रम करू इच्छित असेल तेव्हा तो या वेबसार्इटवर पुन्हा लॉगइन करून पुढचा अभ्यासक्रम सुरू करू शकणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकामुळे देशातील विद्यापीठांना ‘एबीसी’ प्रणाली सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅक’ आणि ‘एनआयआरएफ’साठीही ती ग्राह्य धरली जाणार आहे.
...
प्रगतीपुस्तक क्लिकवर
नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग ‘नॅशनल अकॅडमिक क्रेडिट बँक’ची स्थापना केली आहे. यात देशभरातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण ठेवले जाणार आहेत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या शाखेचे शिक्षण एका कॉलेजमधून आणि दुसऱ्या विषयाचे शिक्षण दुसऱ्या महाविद्यालयामधून घेतले तरी त्याचे गुण या बँकेत साठवले जाणार आहेत. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणात’ याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ही अॅकॅडमिक क्रेडिट बँक वैयक्तिक युनिक आयडीवर साठवली जाणार आहे. यासाठी एक कार्यप्रणालीही विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केली आहे. यात विद्यार्थी एका संस्थेतून दुसऱ्या शिक्षण संस्थेत जाताना कोणताही कागद न घेता गेला आणि हा युनिक आयडी क्रमांक घेऊन गेला तरी त्या संस्थेला विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती एका क्लिकवर पाहता येऊ शकणार आहे.
...